बुलढाणा,दि.१६-शासकीय कामकाजात जशी सांघिक भावना आवश्यक आहे, तशीच ती खेळातूनही अधिक दृढ होते. जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारा, उत्तम आरोग्य व मित्रत्वाची भावना रुजविणारा उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित स्पर्धांचे उद्घाटन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजासोबतच क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आरोग्य व खेळाडूवृत्ती जपावी, असे आवाहन केले. उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्वतः क्रिकेट खेळत षटकार लगावत स्पर्धेला उत्साहाची सुरुवात केली.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी केले. सूत्रसंचालन तहसिलदार वृषाली केसकर व शिवानंद वाकदकर यांनी केले.





