43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता बेकायदेशीर कर्जवाटपाचा भंडाफोड; अकोला सहकार विभागाच्या धडक कारवाई

बेकायदेशीर कर्जवाटपाचा भंडाफोड; अकोला सहकार विभागाच्या धडक कारवाई

0
25

blank

अकोला- शहरात बेकायदेशीर सावकारी व्यवसायाविरोधात सहकार विभागाने मोठी आणि धडक कारवाई करत ‘बाफणा’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या तीन सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध सावकारी व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने कठोर पवित्रा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

उपनिबंधक दीपक वामनराव शिरसाट, अकोला यांनी सादर केलेल्या सविस्तर अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. बेकायदेशीररित्या कर्जवाटप सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सहकार विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला होता. उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला यांच्या आदेशानुसार संबंधितांविरुद्ध आवश्यक कागदपत्रे व छायाप्रती जोडून एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम, २०१४ च्या कलम १६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्राप्त तक्रारीनुसार दिलीप सुवालाल बाफणा (रा. विवेकानंद आश्रमाजवळ, सुधीर कॉलनी, अकोला) आणि चेतन सुभाष बाफणा (रा. सिद्ध निवास, भारत विद्यालयाजवळ, अकोला) यांच्याविरुद्ध चौकशीसाठी विशेष पथक गठीत करण्यात आले होते. या पथकाने सखोल तपास करत २९ नोव्हेंबर २०२४ रोजी शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी धाडसत्र राबवले.

कारवाईदरम्यान दिलीप सुवालाल बाफणा यांचे राहते घर, कृषी उत्पन्न बाजार समिती येथील बाफणा ट्रेडिंग कंपनीचे दुकान क्रमांक ०५ तसेच चेतन सुभाषचंद्र जैन (बाफणा) यांचे निवासस्थान येथे झाडाझडती घेण्यात आली. पंचनाम्यानुसार कर्जवाटपाच्या नोंदी, व्यवहारांची कागदपत्रे, कर्जदारांची यादी आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले.

जप्त कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीर सावकारी व्यवहार झाल्याचा संशय अधिक बळावला असून त्यांची सखोल तपासणी सुरू आहे. या प्रकरणात तिन्ही सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहकार विभाग व संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, नंदकिशोर शिवराम कापकर (रा. आलेगाव, पातूर) यांच्या तर्फे तसेच सुशीलाबाई तोताराम कापकर (उपसभापती, पंचायत समिती अकोला) यांनी सावकारांविरुद्ध लेखी तक्रार सहकार विभागाकडे दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारेच संपूर्ण कारवाईला वेग आला.

blank