39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News अबुजमाड परिसरातून ३ माओवाद्यांचे मृतदेह व शस्त्र मिळाले,१ जवान शहिद

अबुजमाड परिसरातून ३ माओवाद्यांचे मृतदेह व शस्त्र मिळाले,१ जवान शहिद

0
144

blank

गडचिरोली : जिल्ह्यात अवघ्या बोटावर मोजण्याएवढ्या शिल्लक राहिलेल्या माओवाद्यांना शरण आणण्यासाठी गडचिरोली पोलिसांकडून गेल्या दोन दिवसांपासून अभियान राबविले जात आहे. त्यात भामरागड तालुक्यात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यादरम्यान गडचिरोली आणि छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील माओवाद्यांचे दोन तळ पोलिसांनी उद्ध्वस्त केले. तसेच ३ माओवादी (२ पुरुष व १ महिला) यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले असून त्यांच्याकडून १ एके-४७ व १ एसएलआर शस्त्र जप्त करण्यात आले आहे. तिन्ही माओवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. आणखी काही माओवादी ठार किंवा जखमी झाले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.

विशेष म्हणजे या चकमकीदरम्यान जखमी C-60 जवान दिपक चिन्ना मडावी, वय ३८ वर्षे, सध्या राहणार अहेरी व मूळ पत्ता मांड्रा, दामरांचा, तालुका अहेरी यांना आज पहाटे अबुझमाड येथील घनदाट जंगलातून हेलिकॉप्टरच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय भामरागड येथे आणण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने अभियानादरम्यान झालेल्या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला असून त्यांना वीरमरण आले आहे.

सदर अभियानादरम्यान आणखी एक जवान जोगा मडावी, रा. किष्टयापल्ली हे रात्री गोळी लागून जखमी झाले होते. त्यांनाही हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून भामरागड येथे आणण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना लवकरच गडचिरोली येथे हेलिकॉप्टरच्या मदतीने आणण्यात येणार आहे.

दिनांक 3 फेब्रुवारीच्या संध्याकाळी गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या कंपनी क्रमांक 10 चे उर्वरित माओवादी सदस्य आणि छत्तीसगडमधील अज्ञात माओवादी दलममधील सदस्यांबाबत पोलिसांना विश्वसनीय माहिती मिळाली होती. त्याआधारे उपविभागीय पोलीस अधिकारी (भामरागड) यांच्या नेतृत्वात त्याच रात्री 14 सी-60 पथकांसह मौजा फोदेवाडा गावापासून काही किलोमीटर अंतरावर, नारायणपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर शोध मोहीम सुरू करण्यात आली.

दि.4 ला दुपारी काही काळ झालेल्या चकमकीदरम्यान माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त करण्यात आले. मात्र प्रतिकुल भूभाग आणि घनदाट जंगलामुळे माओवाद्यांचा शोध लागू शकला नाही.

दि.5 ला सकाळी राबविण्यात आलेल्या अभियानादरम्यान, अतिरिक्त 4 सी-60 पथक आणि सीआरपीएफ क्यूएटीचे 1 पथक अभियानाकरिता पाठवण्यात आले. सकाळपासून माओवाद्यांशी अधूनमधून चकमक सुरू होती. यादरम्यान एका पुरुष माओवाद्याचा मृतदेह व त्यासोबत 1 एके-47 आणि 1 एसएलआर रायफल अशी अग्निशस्त्रे सापडली. त्यामुळे आणखी काही माओवादी जखमी किंवा ठार झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मृत पुरुष माओवाद्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

blank