
नागपूर, 11 फेब्रुवारी: सर्वसामान्य आणि प्रामाणिक वीज ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, या उद्देशाने महावितरणने कंबर कसली आहे. नरखेड तालुक्यातील बेलोना गावात मंगळवारी पहाटे 6:00 वाजता महावितरणच्या पथकाने गावात धडक देत संशयास्पद 50 ग्राहकांच्या मीटरची कसून तपासणी केली. या धडक मोहिमेमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत.
या कारवाईत एकूण ५० संशयास्पद विद्युत जोडण्यांची तपासणी करण्यात आली. ज्यात 6 ग्राहकांना प्रत्यक्ष वीज चोरी करताना रंगेहात पकडले. या ग्राहकांवर वीज कायदा 2003 (सुधारित 2007) च्या कलम 135 अन्वये सुमारे 35,000 रुपयांची अनियमितता उघडकीस आणून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
काटोल विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक अगाव यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहीमेत सहाय्यक अभियंता शुभम हेडाऊ व नीलेश मेश्राम, कनिष्ठ अभियंता रोहित मेश्राम, सौरभ नैताम वरितेश रामटेके सहभागी झाले होते.
वीज चोरीमुळे वितरण प्रणालीवर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्या ग्राहकांना कमी व्होल्टेज किंवा तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागतो. ही मोहीम केवळ दंडात्मक नसून, प्रत्येक ग्राहकाला हक्काची आणि सुरक्षित वीज मिळावी यासाठीचे एक सकारात्मक पाऊल आहे. महावितरणने स्पष्ट केले आहे की, ग्रामीण भागात विजेची गळती रोखण्यासाठी आणि पारदर्शकता जपण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा भविष्यातही सातत्याने राबवल्या जातील.
वीज चोरी हा केवळ गुन्हा नसून तो सुरक्षिततेसाठीही धोकादायक आहे. नागरिकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, जेणेकरून अपघात टाळता येतील आणि अखंडित सेवा देता येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





