
महारेशीम अभियानांतर्गत किन्हीराजा येथे रेशीम शेती कार्यशाळा उत्साहात
वाशिम, दि.१९ फेब्रुवारी- रेशीम शेती ही केवळ पूरक व्यवसाय तर आहेच.शेतकऱ्यांसाठी नियमित व हमखास उत्पन्नाचा प्रभावी मार्ग सुध्दा आहे. मनरेगा अंतर्गत रेशीम शेतीला भक्कम आर्थिक पाठबळ उपलब्ध असून कुशल व अकुशल कामांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो. तुती लागवड, अंडकोश संगोपन, कोष निर्मिती आणि विक्रीपर्यंतची साखळी योग्य नियोजनाने राबविल्यास कमी कालावधीत चांगला नफा देखील मिळवता येतो असे प्रतिपादन जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुनीलदत्त फडके यांनी केले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा विभाग) व राज्य क्षमता बांधणी कक्ष वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तक गाव मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेती विषयक कार्यशाळा उत्साहात पार पडली.यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यात रेशीम शेतीसाठी पोषक वातावरण असून शासनाने निश्चित केलेले २०० एकरचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. योग्य तांत्रिक मार्गदर्शन, कीड व्यवस्थापन व शाश्वत उत्पादन पद्धतींचा अवलंब केल्यास रेशीम शेतीमधून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळेल, असा विश्वासही श्री फडके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. कार्यशाळेचे प्रास्ताविक निलेश घुगे यांनी करून महारेशीम अभियानाची भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट केली.
जिल्हा रेशीम अधिकारी सुनिलदत्त फडके यांनी पुढे मार्गदर्शन करतांना मनरेगा अंतर्गत रेशीम शेतीसाठी मिळणारे आर्थिक लाभ, कुशल व अकुशल घटकांमधून मिळणारी एकत्रित मदत, रेशीम शेतीचे आर्थिक गणित, प्रारंभिक गुंतवणूक व खर्चाचे नियोजन, उत्पादनानंतर मिळणारा संभाव्य नफा, रेशीम प्रकारांची निवड, उपलब्ध बाजारपेठ, तुती लागवड पद्धती, अंडकोश खरेदीपासून कोष निर्मितीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया, कीड व्यवस्थापन, तांत्रिक काळजी तसेच शाश्वत उत्पादन पद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली. उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देत त्यांनी शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
जिल्ह्यासाठी चालू आर्थिक वर्षात मध्ये २०० एकर क्षेत्रावर रेशीम शेतीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. इच्छुक शेतकऱ्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी श्री.फडके यांनी केले.या कार्यशाळेस उपसरपंच रवींद्र तायडे, ग्रामविकास अधिकारी साळुंखे, तांत्रिक अधिकारी योगेश घुगे, शेतकरी तसेच राज्य क्षमता बांधणी कक्षातील सदस्य उपस्थित होते.





