
गोंदिया,दि.२२ः –महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांचे संकल्पनेतुन यावर्षी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील असणाऱ्या आरोग्य संस्थाना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान 2026 पुरस्काराने आज(दि.२२) मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सक गटामध्ये ग्रामीण रुग्णालय देवरी व जिल्हा आरोग्य अधिकारी गटात गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडाला आरोग्य रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्यस्तरीय सोहळ्याल राज्यातील आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे आरोग्य संस्था,जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक,वैद्यकीय अधिक्षक,वैद्यकीय अधिकारी,सर्जन,आशा सेविका यांचा सत्कार सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर व (सार्वजनिक आरोग्य) राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांचे हस्ते गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी अभियानाचे आयुक्त व अभियान संचालक डॉ.कादंबरी बलकवडे,संचालक 1आरोग्य सेवा(मुंबई) डॉ.नितीन अंबाडेकर,संचालक 2आरोग्य सेवा( पुणे) डॉ.विजय कंदेवाड,सार्वजनिक आरोग्य विभाग सचिव-1 डॉ.निपुन विनायक,सचिव-2 ई.रविंद्रन यांचे सह राज्यस्तरावरील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम देवरी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय देवरी यांची जिल्हा शल्य चिकित्सक गट तर ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य अधिकारी गटात उत्कृष्ट आरोग्य सेवा दिल्याबद्दल गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार देण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार व वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहा भावे यांनी तर ग्रामीण रुग्णालय देवरीच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले व वैद्यकीय अधिक्षक डॉ.गगन गुप्ता यांनी पुरस्कार स्विकारला.
दोन्ही आरोग्य संस्थाना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने जिल्ह्याचे नाव लौकीक उंचाविले आहे.उपलब्ध साधन सामुग्री व मनुष्यबळात त्यांनी दिलेल्या उत्कृष्ट आरोग्य सेवेबद्दल जिल्हाधिकारी प्रजित नायर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंम,जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर,उपाध्यक्ष सुरेश हर्षे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत,गोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी संस्थेतील आरोग्य कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे.
गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडा यांनी जिल्ह्यात वर्ष 2025-26 मध्ये प्रसुती,कुटुंबकल्याण पुरुष/स्त्री शस्त्रक्रिया व आरोग्य निर्देशकांमध्ये ग्रामीण भागात उत्कृष्ट आरोग्य सेवा बजावत असून तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहा भावे व त्यांची टीम त्यात समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,आरोग्य सहायिका,आरोग्य सहाय्यक, फार्मासिस्ट,आशा सेविका,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,आशा गट प्रवर्तक यांच्या एकत्रित टीमवर्कमुळे आरोग्य संस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
– डॉ.अभिजीत गोल्हार जिल्हा आरोग्य अधिकारी
देवरी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय देवरी यांनी बाह्यरुग्ण सेवा,आंतर रुग्ण सेवा,मेजर व मायनर शस्त्रक्रिया,प्रसुती,सिझेरियन तसेच आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आरोग्य निर्देशकांत वैद्यकीय अधिक्षक डॉ.गगन गुप्ता व त्यांचे टिम त्यात वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स,स्टाफ ब्रदर यांच्या एकत्रित टीमवर्कमुळे आरोग्य संस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
– डॉ.पुरुषोत्तम पटले,जिल्हा शल्यचिकित्सक





