32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home क्रीडा अमरावती विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत यवतमाळ जिल्हा अव्वल

अमरावती विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत यवतमाळ जिल्हा अव्वल

0
43

blank

यवतमाळ,दि.24 : यंदाच्या तीन दिवसीय अमरावती विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल यवतमाळ येथे उत्साहात पार पडल्या. या दोन्ही स्पर्धेत विभागातील पाचही जिल्ह्यांमधून यवतमाळ जिल्ह्याने अव्वल स्थान गाठत पहिल्या क्रमांकाचे बक्षिस पटकावले. तर सर्वसाधारण क्रीडा स्पर्धेत अमरावती जिल्ह्याने व सांस्कृतिक स्पर्धेत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने द्वितीय क्रमांकाचे बक्षिस मिळवले. या बक्षिसांचे वितरण विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते करण्यात आले.

blank

या बक्षिस वितरण सोहळ्याला जिल्हाधिकारी विकास मीना, विभागीय अपर आयुक्त संजय जाधव, विरेंद्र हजारे, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, महसूल कर्माचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप कोलेवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

blank

“अमरावती विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात व आनंदी वातावरणात झाल्याचा आनंद आहे. या स्पर्धांमध्ये अधिकारी- कर्मचारी ज्या उत्साह व आनंदाने सहभागी झाले, तोच उत्साह व आनंदी वातावरण नेहमी कायम ठेवावे आणि खिलाडूवृत्तीने नियमित कामकाज करावे. तसेच या स्पर्धेत जे सहभागी झाले नाही त्यांनाही प्रोत्साहित करावे. जीवनात नेहमी आनंदी राहून उत्साहाने आपले कामकाज करावे”, असे आवाहन विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी यावेळी केले.

“ही स्पर्धा कौटुंबिक वातावरणात झाली. या स्पर्धेत खेळाडूंनी दाखवलेली शिस्त, वचनबद्धता, समर्पण भावना अविस्मरणीय असून त्यांचा उत्साह कौतुकास्पद आहे. हीच भावना आणि उत्साहाची प्रशासनाच्या नियमित कामकाजात अंमलबजावणी करावी. मैदानावर जिंकण्यासाठी शिस्त, टिम वर्क आणि नेतृत्व गुण महत्त्वाचे असतात ते नियमित प्रशासनात आण्यासाठी लक्ष्य केंद्रीत करावे. तसेच जनतेच्या कामांसाठी हे गुण आत्मसात करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले.

blank

या स्पर्धेत विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील चमू सहभागी झाले होते. क्रीडा स्पर्धेत विभागीय आयुक्त कार्यालयास ५९, अकोला ८५, अमरावती २०१, यवतमाळ २८५, बुलढाणा ७८ आणि वाशिम १०९ अशी अंतिम गुणतालिका जाहीर करण्यात आली. तसेच सांस्कृतिक स्पर्धेत विभागीय आयुक्त कार्यालयास २४४.५ व यवतमाळ जिल्ह्यास २६४.५ गुण मिळाले. या बक्षिस वितरण सोहळ्यात विविध सांघिक व एकल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमधील विजेता, उपविजेत्यांचा पारितोषिक देवून सन्मान करण्यात आला. यात कबड्डी, क्रिकेट, वॅालीबॅाल, फुटबॅाल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, खो-खो आदी क्रीडा स्पर्धा व नृत्य, अभिनय, गीतगायन, नाटक आदी सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्यांचा समावेश होता.

या सोहळ्याचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी केले. तहसिलदार योगेश देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.या बक्षिस वितरण सोहळ्याच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रगीताने महसूल महोत्सवाचा समारोप करण्यात आला.

blank