37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ लोककल्याणकारी योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा-अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला

लोककल्याणकारी योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा-अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला

0
60

blank

  *योजनांच्या मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन*

गोंदिया, दि.24 : शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले.जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित “योजना जनकल्याणाच्या मल्टीमीडिया प्रदर्शनाचे” उद्घाटन श्री. मुल्ला यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार श्रीकांत कांबळे, जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे, जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे-निमसरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री. मुल्ला पुढे म्हणाले, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. परंतु, या योजनांची लोकांना माहिती नसल्यामुळे सदर योजनांपासून सर्वसामान्य नागरिक वंचित राहतात. त्यामुळे सदर योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल तेव्हाच योजनांची फलश्रृती होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा माहिती कार्यालयाचा हा स्तुत्य उपक्रम आहे. शासनाच्या सर्वसाधारण योजनांच्या या एकाच ठिकाणी प्रधानमंत्री पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, वैयक्तिक शेततळे योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अशाप्रकारच्या एकूण 40 योजनांचा या प्रदर्शनीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी नवीन प्रशासकीय इमारतीत लावण्यात आलेल्या 24 ते 26 फेब्रुवारी 2026 या तीन दिवसीय चित्रमय प्रदर्शनास भेट देऊन माहिती जाणून घ्यावी व शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांनी यावेळी केले.

राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध विभागातील लोककल्याणकारी योजनांची माहिती गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना मल्टीमीडियाच्या माध्यमातून व्हावी, या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने 24 ते 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे करण्यात आले आहे. प्रत्येक विभागाने योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून काम करावे. सदर प्रदर्शनी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुली आहे, असे जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे-निमसरकर यांनी प्रास्ताविकातून सांगितले.

यावेळी तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार श्रीकांत कांबळे, जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे यांनी शासनाच्या सर्वसाधारण योजनांच्या 40 योजनांची माहिती एकाच ठिकाणी चित्रमय स्वरुपात उपलब्ध होत असल्यामुळे या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करुन जिल्ह्यातील शेतकरी, नवउद्योजक, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी या प्रदर्शनीला अवश्य भेट द्यावी असे आवाहन केले.याप्रसंगी असर फाऊंडेशनचे विक्रम फडके व त्यांच्या चमुने शासनाच्या सर्वसाधारण योजनांची माहिती कलापथनाट्यद्वारे सादर करुन उपस्थितांचे मने जिंकली.

       या प्रदर्शनीच्या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पापड, कुरोडी व चिप्सचे स्टॉल आणि जिल्हा परिषदेच्या उमेद अंतर्गत गोंडी पेंटींगचे स्टॉल लावण्यात आले आहेत.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रजनी रामटेके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उपसंपादक कैलाश गजभिये यांनी मानले. कार्यक्रमास नवीन प्रशासकीय इमारतीतील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank