37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ शिरपूर सीमा तपासणी नाक्यावरील अवैध वसुली विरोधात खा. पडोळेच्या आंदोलनाला गावकर्‍यांच्या विरोध

शिरपूर सीमा तपासणी नाक्यावरील अवैध वसुली विरोधात खा. पडोळेच्या आंदोलनाला गावकर्‍यांच्या विरोध

0
34

blank

– मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर चेकपोस्टवरीला घटना
गोंदिया-मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील देवरी तालुक्यातील शिरपूर येथील परिवहन सीमा तपासणी नाक्यावर ट्रक चालकांची लूट केली जात असल्याचा आरोप करत भंडारा-गोंदियाचे काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी शनिवारी २८ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास तपासणी नाक्यावर ठिय्या मांडून आंदोलनाला सुरुवात केली. मात्र, स्थानिक शिरपूर येथील काही नागरिकांनी खासदारांच्या या आंदोलनाचा विरोध करून आमचा रोजगार हिरावणार असे बोलून त्यांच्याशी वाद घातला. त्यामुळे गावकरी व खासदारांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग-५३ हा गोंदिया जिल्ह्यातून जात असून महाराष्ट्र-छत्तीसगड-ओडीसा-पश्चिम बंगाल-झारखंड तसेच देशातील विविध राज्य व महानगरांना जोडला जाणारा हा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे.

खासदारांनी सांगितले की, चेकपोस्टवर ट्रकचालकांकडून खुलेआम पैसे घेतले जात असल्याचे त्यांनी स्वतः पाहिले. आरटीओ कार्यालयाच्या खिडकीतून ‘स्टॅम्प’च्या नावाखाली ५०० ते १५०० रुपयांपर्यंत रोख रक्कम घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या पैशांसाठी कोणताही अधिकृत आदेश आहे का आणि या रकमेचा हिशोब कुठे जातो, याबाबत प्रशासनाने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच या वसुलीला विरोध करणाऱ्या काही ट्रकचालकांना मारहाण केली जात असल्याची गंभीर तक्रारही समोर आली आहे. भीती निर्माण करण्यासाठी काही गावगुंड लाठ्या घेऊन उभे असतात आणि त्यामुळे ट्रकचालकांना जबरदस्तीने पैसे द्यावे लागतात, असेही चालकांनी सांगितले.

या प्रकारात संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक घटकांच्या संगनमताशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर वसुली होणे शक्य नाही. यापूर्वी दोनदा तक्रार करूनही कारवाई न झाल्याने या प्रकरणाला वरिष्ठ पातळीवरही पाठबळ असल्याचा संशय निर्माण होत असल्याचे खासदारांनी नमूद केले.या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी चेकपोस्ट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करावे, संबंधित अधिकाऱ्यांच्या कॉल डिटेल्स व आर्थिक व्यवहारांची तपासणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना सविस्तर पत्र पाठवून उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची, दोषींवर गुन्हे दाखल करण्याची आणि सध्या कार्यरत अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.“जोपर्यंत ही अवैध वसुली पूर्णपणे थांबत नाही, तोपर्यंत मी स्वतः तिथे छावणी टाकून थांबेल आणि गरज पडल्यास आंदोलन करण्यासही मागे हटणार नाही,” असा इशाराही खासदारांनी दिला.

blank