
ुंबई -विद्यापीठाच्या कालिना परिसरात सुरू असलेल्या संशोधक विद्यार्थी तथा बौद्ध भिक्षू भदंत विमांसा यांच्या शांततापूर्ण
सत्याग्रहाला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले ज्येष्ठ व जागतिक कीर्तीचे माहितीपट दिग्दर्शक डॉ. आनंद पटवर्धन यांना विद्यापीठाच्या प्रमुख प्रवेशद्वारावर सुरक्षा यंत्रणेकडून रोखण्यात आले. विद्यापीठ प्रशासनाकडून आता भन्तेंच्या भेटीसाठी येणाऱ्यांनाही मज्जाव केला जात असल्याने बौद्ध समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पटवर्धन येत असताना सुरक्षारक्षकांकडून चक्क विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वारच बंद करण्यात आले असल्याने आता भन्तेंना एकाकी पाडून त्यांचे काही बरेवाईट करण्याचा प्रशासनाचा हेतू नाही ना असा सवाल यावेळी उपस्थित बौद्ध अनुयायांनी केला.
भदंत विमांसा हे मागील १९० दिवसांपासून पाली भाषा विभागाच्या जतन व संवर्धनासाठी, स्वतंत्र पाली भाषा भवन उभारणीसाठी,विभागाला अनुदान देण्यासाठी तसेच कॉ. अण्णाभाऊ साठे विद्यार्थी वसतिगृहाच्या नूतनीकरणासह ३०० विद्यार्थ्यांसाठी नव्या वसतिगृहाच्या उभारणीसाठी शांततामय पद्धतीने सत्याग्रह करत आहेत. मात्र, त्यांच्या आंदोलनाची दखल न घेता विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांचा पीएच.डी. प्रवेश रद्द करण्यात आल्याची व अमानवी वागणूक दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे. मागील एक महिन्यापासून त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर सील लावण्यात आले असून स्वच्छतागृह व स्नानाची सुविधा नाकारण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ते एकाच चिवरावर सत्याग्रहस्थळी बसले असल्याचेही निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. आनंद पटवर्धन यांनी सत्याग्रहस्थळी भेट देऊन नैतिक समर्थन व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने त्यांनी प्रवेशद्वाराजवळच भदंत विमांसा यांची भेट घेऊन गुलाबाचे फूल देत त्यांची विचारपूस करत त्यांच्या सत्याग्रहाला समर्थन दिले. या वेळी सुरक्षा रक्षक व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व संपूर्ण घडामोडींचे चित्रीकरण करत होते.या घटनेमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही मूल्ये व शांततामय सत्याग्रहाच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उपस्थित लोकांनी दिली. एका ज्येष्ठ व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त दिग्दर्शकास विद्यापीठ परिसरात प्रवेश न देणे ही बाब दुर्दैवी व निषेधार्ह असल्याचेही अनेकांनी नमूद केले. तसेच विद्यापीठ प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी व लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या सत्याग्रहाला अडथळा निर्माण करू नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
दरम्यान, सत्याग्रहाचा तंबू सील केल्यामुळे भदंत विमांसा हे मागील एक महिन्यापासून जमिनीवर झोपत असल्याची माहिती
मिळाल्यानंतर एका बौद्ध उपासकाने त्यांना अंथरूण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, “मी सत्याग्रहावर असून प्रशासन जितका त्रास देईल तो सहन करण्यास तयार आहे; मला कोणतीही वैयक्तिक मदत नको,” असे सांगत भदंत विमांसा यांनी ती मदत नम्रपणे नाकारली.भदंत विमांसा यांच्या सत्याग्रहाला विविध सामाजिक, शैक्षणिक व मानवी हक्क संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याची माहिती लोकशाहीर संदेश गायकवाड यांनी दिली.





