35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?

शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?

0
1279

blank

महायुती सरकार सत्तेत आल्यापासून कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे नवनिर्वाचित अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (FM Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडताना कर्जमाफीच्या (Loan Waiver Scheme) निर्णयाची घोषणा केली. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) कर्जमाफी योजना राबवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यासाठी समिती गठीत केली आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे, अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ दिला जाणार असल्याचेही फडणवीस यांनी जाहीर केले.

कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ देण्यासोबत राज्यातील बँकिग यंत्रणा सक्षम असावी, यासाठी समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमचा कर्जमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प असून समितीच्या शिफारसीनुसार दीर्घकालीन उपाययोजन केल्या जात आहेत, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महायुती सरकार सत्तेत आल्यापासून विरोधकांकडून महायुती सरकारला शेतकरी कर्जमाफीच्या योजनेचे काय झाले, असा जाब विचारत होते. निवडणूक झाल्यानंतर सरकार शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन विसरले, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. मात्र, आज देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा करुन विरोधकांच्या या टीकेतील हवा काढून घेतली आहे. मात्र, ही कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार, याचे निकष आणि तपशील अद्याप समोर येणे बाकी आहे.

blank