23.9 C
Gondiā
Wednesday, August 19, 2026
Home विदर्भ रस्त्यासाठी चिखलीवासी रस्त्यावर,जि.प.सदस्य सहलीवर

रस्त्यासाठी चिखलीवासी रस्त्यावर,जि.प.सदस्य सहलीवर

0
71

तिरोडा, ता. २२ : तिरोडा-गोरेगाव मार्गावरील चिखली गावाजवळील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी शनिवारी (ता. २१) रास्ता रोको आंदोलन करीत संताप व्यक्त केला.तर या मतदारसंघाचे सदस्य मात्र मतदारसंघातील समस्या सोडवण्याएैवजी केरळ राज्यात सहलीवर गेल्याची चर्चा होती. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, उखडलेला डांबर आणि उडणारी धूळ यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले असून, आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे.वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
तसेच रस्त्यावरून सतत उडणारी धूळ घराघरांमध्ये साचत आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनासंबंधी त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत नागरिकांनी शनिवारी सरपंच कैलाश पटले यांच्या नेतृत्वात दोन तास तिरोडा-गोरेगाव मार्ग बंद ठेवत आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. नागरिकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली. प्रशासनाने दखल न घेतल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.

आमदार रहांगडाले यांची आंदोलनस्थळी भेट
दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळताच आमदार विजय रहांगडाले यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित कंत्राटदाराला तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. रस्त्यावर उडणारी धूळ कमी करण्यासाठी तातडीने पाण्याचे टँकर सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. त्यामुळे नागरिकांनी हे आंदोलन मागे घेतले.