25.1 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home Top News ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२६’ला भारतीय-अमेरिकन रसिकांची विक्रमी दाद!

‘नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२६’ला भारतीय-अमेरिकन रसिकांची विक्रमी दाद!

0
9

हॉलिवूड नगरीत मराठी अस्मितेचा झंझावात!

५ मराठी चित्रपटांचे प्रीमिअर • ११ शॉर्टफिल्म्सचे स्क्रीनिंग • दिग्गज कलाकारांच्या संवादांनी रंगला सॅन होजेचा मराठमोळा उत्सव!

 सॅन होजे, कॅलिफोर्निया (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने ७ ते ९ ऑगस्टदरम्यान सॅन होजे येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (NAFA) मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२६चा तीन दिवसांचा दिमाखदार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अमेरिकेतील भारतीय आणि मराठी रसिकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संपूर्ण महोत्सवाला अक्षरशः मराठी मनांच्या महासोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले.

हॉलिवूडच्या जगप्रसिद्ध नगरीत मराठी सिनेमाचा झेंडा फडकविणाऱ्या या महोत्सवात ५ मराठी चित्रपटांचे प्रीमिअर आणि ११ पुरस्कारप्राप्त शॉर्टफिल्म्सचे विशेष स्क्रीनिंग झाले. चित्रपटांबरोबरच महाराष्ट्रातून आलेल्या कलाकारांचे अनुभव, विचार आणि सिनेसृष्टीतील प्रवास ऐकण्याची संधी रसिकांना मिळाली. दिग्गज कलाकारांच्या मनमोकळ्या संवादांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

‘नाफा’ म्हणजे केवळ सिनेमा नव्हे, तर हा मराठी अस्मितेचा जागतिक सेतू!

नाफाचे संस्थापक-अध्यक्ष अभिजित घोलप म्हणाले, “नाफाचा हा तिसरा महोत्सव म्हणजे केवळ चित्रपटांचा उत्सव नाही, तर अमेरिकेच्या भूमीत मराठी भाषा, संस्कृती, कला आणि आपल्या मातीशी जोडलेल्या भावनांचा जागतिक जागर आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यामुळे या उपक्रमाला यंदा नवी ताकद मिळाली. अमेरिकेतील मराठी रसिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि महाराष्ट्रातून आलेल्या कलावंतांचा सहभाग ही नाफाच्या प्रवासातील सर्वात मोठी ऊर्जा आहे. मराठी सिनेमा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे आणि नव्या पिढीला आपल्या भाषा-संस्कृतीशी जोडणे हेच नाफाचे पुढील ध्येय आहे.”ते पुढे म्हणाले, “तीन दिवसांच्या महोत्सवात प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद आणि समाधान हीच आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीची खरी पावती आहे. नाफा आता अमेरिकेतील मराठी समाजाचा उत्सव बनला आहे.”blank

रेड कार्पेटवर मराठी तारकांचा ‘ग्लोबल स्वॅग’!

महोत्सवाची सुरुवात हॉलिवूडच्या ग्लॅमरला साजेशा दिमाखदार रेड कार्पेट सोहळ्याने झाली. रोहिणी हट्टंगडी, महेश कोठारे, अतुल कुलकर्णी, नागराज मंजुळे, अजिंक्य देव, प्रसाद ओक, गिरीजा ओक, श्रुती मराठे, अर्चना जोगळेकर, तृप्ती भोईर, सई देवधर, मंजिरी ओक आणि गार्गी कुलकर्णी यांच्या उपस्थितीने रेड कार्पेटवर मराठी कलाविश्वाचा ‘स्वॅग’ पाहायला मिळाला. महाराष्ट्रीयन परंपरा, भारतीय संस्कृती आणि आधुनिक ग्लोबल स्टाईलचा सुरेख मिलाफ असलेल्या कलाकारांच्या उपस्थितीने California Theatre परिसरात मराठमोळ्या उत्साहाची लाट उसळली.

रोहिणी हट्टंगडींना ‘नाफा जीवन गौरव’

महोत्सवातील अत्यंत भावनिक क्षण ठरला तो ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना प्रदान करण्यात आलेल्या ‘नाफा जीवन गौरव’ पुरस्काराचा. हा सन्मान स्वीकारताना रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, “मला अजून खूप काम करायचे आहे. जीवन गौरव मिळाल्यानंतर घरी बसण्याचा माझा अजिबात विचार नाही. भारताबाहेर मिळालेला हा माझा पहिलाच पुरस्कार असल्याने हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत विशेष आणि भावनिक आहे.”

रोहिणी हट्टंगडी – “जीवन गौरव हा प्रवासाचा शेवट नाही; अजून खूप काम करायचे आहे!”

महेश कोठारे : आठवणींपासून नव्या पिढीच्या स्वप्नांपर्यंत

ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या अनुभवकथनाने रसिकांना मराठी सिनेमाच्या सुवर्णकाळापासून आजच्या बदलत्या चित्रपटविश्वापर्यंतचा प्रवास अनुभवता आला.

महेश कोठारे — “मराठी सिनेमाची ताकद त्याच्या मातीशी जोडलेल्या कथांमध्ये आहे; ती ताकद जगापर्यंत पोहोचली पाहिजे.”

नागराज मंजुळे : मातीतील कथा थेट जगाच्या मनात!

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या संवादाने वास्तववादी मराठी सिनेमाच्या ताकदीवर आणि सामान्य माणसाच्या कथांना मिळणाऱ्या जागतिक प्रतिसादावर विचारमंथन झाले.

नागराज मंजुळे — “आपल्या मातीतील आणि आपल्या माणसांच्या कथा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील प्रेक्षकांच्या मनाला भिडू शकतात.”

अजिंक्य देव : मराठी कलाकारांसाठी जग खुले!

अभिनेते अजिंक्य देव यांनी बदलत्या जागतिक माध्यमविश्वात मराठी कलाकारांसमोर निर्माण होणाऱ्या नव्या संधींवर संवाद साधला.

अजिंक्य देव — “आज मराठी कलाकारासाठी सीमा महाराष्ट्रापुरत्या राहिलेल्या नाहीत; जगाचे व्यासपीठ खुले आहे.”

प्रसाद ओक : परदेशातील प्रेक्षक म्हणजे मराठी सिनेमाची खरी ताकद!

अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या मनमोकळ्या संवादाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

प्रसाद ओक — “परदेशात राहूनही मराठी प्रेक्षक आपल्या सिनेमाशी इतक्या मनापासून जोडलेले आहेत, हीच मराठी कलाविश्वाची खरी ताकद आहे.”

गिरीजा ओक : कलाकार आणि रसिकांमधील अंतर मिटवणारे व्यासपीठ

अभिनेत्री गिरीजा ओक यांनी अभिनय, महिला कलाकार आणि नव्या पिढीतील सर्जनशीलतेवर संवाद साधला.

गिरीजा ओक — “नाफासारख्या व्यासपीठामुळे जगभरातील मराठी प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातील अंतर अक्षरशः मिटते.”

श्रुती मराठे : मराठी कथांना मिळतेय ग्लोबल विंडो!

अभिनेत्री श्रुती मराठे यांनी नव्या पिढीतील कलाकार आणि जागतिक प्रेक्षकांपर्यंत मराठी आशय पोहोचविण्याच्या संधींबाबत संवाद साधला.

श्रुती मराठे — “मराठी कथा आणि कलाकारांना जगभरातील प्रेक्षक मिळणे ही आजच्या पिढीसाठी मोठी आणि उत्साहवर्धक संधी आहे.”

पाच चित्रपट, अकरा शॉर्टफिल्म्स आणि हजारो चित्रपट प्रेमींच्या टाळ्यांचा नाद!

तीन दिवसांत सादर झालेल्या विविध आशयाच्या चित्रपट आणि लघुपटांना रसिकांनी मनापासून दाद दिली. विशेषतः ५ मराठी चित्रपटांचे प्रीमिअर आणि ११ पुरस्कारप्राप्त शॉर्टफिल्म्सचे स्क्रीनिंग हा महोत्सवाचा प्रमुख आकर्षणबिंदू ठरला.

चित्रपटांबरोबरच चर्चासत्रे, कलाकारांशी संवाद, मार्गदर्शनपर कार्यक्रम आणि मनोरंजनात्मक उपक्रमांनी महोत्सवाची रंगत वाढवली. महाराष्ट्रातून आलेल्या कलाकारांचे अनुभव प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळाल्याने अमेरिकेतील मराठी रसिकांसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छांनी महोत्सवाला विशेष बळ

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफा महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यामुळे यंदाच्या महोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले. अमेरिकेच्या भूमीवर मराठी भाषा, कला, संस्कृती आणि चित्रपटांचा जागर घडविणाऱ्या या उपक्रमाचे त्यामुळे विशेष महत्त्व अधोरेखित झाले.

नव्या वर्षात अधिक उत्साहात आणि व्यापक स्वरूपात आयोजनाचे वचन देत ‘नाफा २०२६’ ची सांगता

तीन दिवसांच्या या महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद पाहता ‘नाफा’ आता केवळ एक फिल्म फेस्टिव्हल राहिलेला नसून अमेरिकेतील मराठी समाजाचा सांस्कृतिक उत्सव आणि महाराष्ट्राला जगाशी जोडणारा प्रभावी सेतू बनला आहे. पुढील वर्षी हा महोत्सव अधिक जोमाने, अधिक उत्साहाने अधीक भव्य स्वरूपात आयोजित केला जाईल असे अभिजित घोलप यांनी सांगता समारंभात जाहीर केले.

या सोहळ्यात ८ पुरस्कार विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले, निवडलेल्या व या महोत्सवात दाखविलेल्या मायक्रो-ड्रामा आणि लघुपटांना (short film) पारितोषके देऊन गौरवण्यात आले. सेलिब्रिटी मास्टरक्लासेस, भेटीगाठी (Meet & Greet), अर्चना जोगळेकर यांची कार्यशाळा, अतुल कुलकर्णी यांचा ‘मायक्रो-ड्रामा’ निर्मात्यांशी संवाद, नागराज, महेश, अतुल – दिग्दर्शकांचा संवाद (Directors’ Grid) अश्या विविधांगी कार्यक्रमांमुळे हा महोत्सव विशेष ठरला. California Theatreमध्ये उमटलेल्या टाळ्यांचा कडकडाट, कलाकारांभोवतीची गर्दी, चित्रपटांवरील चर्चा आणि रसिकांच्या चेहऱ्यावरील समाधान यामुळे तिसरा नाफा महोत्सव संस्मरणीय ठरला. मराठी सिनेमा आता फक्त महाराष्ट्राचा नाही…तो जगभरातील मराठी मनांचा अभिमान आहे!

blank