कुणबी समाज सेवा समितीची मागणी
आमगाव : तालुक्यातील किडंगीपार येथील दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी २० मार्च रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन छेडले. या मोर्चात महिला, पुरुष तसेच युवक सहभागी झाले होते. मात्र उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस शिपाई यांनी महिलांवर अभद्ररित्या व्यवहार करून अपमानित केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन कुणबी समाज सेवा समिती आमगावच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
आमगाव नगर पंचायत क्षेत्रा अंतर्गत किडंगीपार येथे देशी दारूची दुकान सुरू करण्यात आली आहे. ही दुकान गावात असल्यामुळे ती बंद करण्यात यावी, यासाठी किडंगीपार येथील ग्रामस्थांनी २० मार्च रोजी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. दरम्यान निवेदन देण्यासाठी महिला व पुरुष जात असतांना तहसील कार्यालयाचे दोन्ही गेट बंद करण्यात आले. व मोर्चा रस्त्यावर थांबविण्यात आला. दरम्यान तहसील कार्यालय समोरील रस्त्यावर मोर्चा असताना सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पोलिस प्रशासनाकडून कुठलेही आदेश नसतांना उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी महिलांशी अभद्र व्यवहार करून अपमानित केले. तेव्हा या गैर व्यवहार व अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करून निलंबित करण्यात यावे, अशामागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री,पालकमंत्री व महिला आयोगाच्या अध्यक्षांना देण्यात आले आहे. निवेदन देतेवळी समितीचे नितेश दोनोडे, संजय बहेकार, रविंद्र
यटरे, पवन गायधने, तिरथ येटरे, शरद फुंडे, अॅड. शालिकराम बागडे, राजेंद्र मेंढे, राकेश ब्राम्हणकर, भुमेश शेंडे आदी उपस्थित होते.
किडंगीपार येथील दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवार, २० मार्च रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनात महिला, पुरुष तसेच युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. विशेष म्हणजे शेकडो महिलांनी स्वस्फूर्तपणे सहभाग नोंदवून दारूबंदीच्या मागणीसाठी ठाम भूमिका मांडली. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही रास्ता रोको आंदोलन सुरूच ठेवले आहे.
वाहतूक विस्कळीत
आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय राज्य महामार्ग ५४३ वर मार्ग अडवून रस्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे आमगाव-देवरी मार्गावरील वाहतूक ठप्प करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जड वाहनांसह अनेक वाहने रांगेत अडकली. तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळली, मात्र आंदोलन दुसऱ्या दिवशीही कायम राहिले.





