23.4 C
Gondiā
Wednesday, August 19, 2026
Home विदर्भ शिक्षण तज्ञ शरद काथवटे यांचे निधन

शिक्षण तज्ञ शरद काथवटे यांचे निधन

0
100

गोंदिया : येथील सिव्हिल लाईन परिसरात वास्तव्यास असलेले ज्येष्ठ शिक्षण तज्ञ शरद आत्माराम काथवटे यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी (दि. 20 मार्च) निधन झाले. मृत्यूसमयी ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने गोंदिया जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
शरद काथवटे यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले. ते काही काळ नागपूर बोर्डाच्या अभ्यास मंडळावर कार्यरत होते. उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
गोंदिया येथील मुनिसिपल शाळेत मुख्याध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्षे सेवा बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षांमध्ये गुणवंत यादीत सातत्याने स्थान मिळवले. गुणवंत विद्यार्थी घडविण्यात त्यांचा हातखंडा होता.
निवृत्तीनंतरही त्यांनी शिक्षण क्षेत्राशी नाळ जोडलेली ठेवली. गडचिरोली जिल्ह्यात मानव विकास मिशन अंतर्गत जिल्हा परिषद शाळांच्या प्रगतीसाठी त्यांनी मोलाचे कार्य केले. तसेच युनिसेफसाठीही त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपले योगदान दिले.
संपूर्ण आयुष्य शिक्षणाच्या सेवेत व्यतीत करणारे शरद काथवटे हे ‘हाडाचे शिक्षक’ म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आयुष्यभर ही ओळख जपली. त्यांच्या निधनाने एक कर्तव्यदक्ष, आदर्श आणि प्रेरणादायी शिक्षक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली आणि मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे.