24.5 C
Gondiā
Tuesday, August 25, 2026
Home शैक्षणिक स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक” – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा”

स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक” – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा”

0
23
**कुरंडीमाल आश्रमशाळेत अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन*
गडचिरोली, दि.26 :“गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आत्मविश्वास, आर्थिक साक्षरता, आरोग्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे अत्यावश्यक आहे. यामुळेच विद्यार्थी जागतिक स्पर्धात्मक युगात सक्षमपणे उभे राहू शकतात,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.
शासकीय आश्रमशाळा, कुरंडीमाल (ता. आरमोरी) येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे ही काळाची गरज आहे. मेल-जोल संस्थेने आदिवासी विकास विभागाशी समन्वय साधून कुरंडीमालसारख्या दुर्गम भागात संगणक प्रयोगशाळा उभारणे हे अत्यंत स्तुत्य कार्य आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात व कौशल्यात मोठी भर पडून त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. तसेच डिजिटल दरी कमी करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अत्याधुनिक संगणक, इंटरनेट सुविधा व डिजिटल शिक्षण साधनांनी सुसज्ज असलेल्या या प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध होणार असून डिजिटल युगातील आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यास मोठी मदत होणार आहे.
कार्यक्रमास सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी एम. अरुण, मेल-जोल संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंकजा, उपविभागीय अधिकारी प्रसेनजीत प्रधान, तहसीलदार उषा चौधरी तसेच शासकीय आश्रमशाळा, कुरंडीमालचे मुख्याध्यापक आर. जी. तुमराम यांची प्रमुख उपस्थिती होती.
०००