
बहादूर : मार्च महिन्याच्या अखेरीस शासकीय कामांची लगबग वाढल्यामुळे बहादूर नगरपंचायतीच्या कर विभागात आज मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. विविध कर संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी नागरिक सकाळपासूनच कार्यालयात दाखल झाले होते.
मात्र, मागील तासभरापासून अधिकारी व कर्मचारी मीटिंगमध्ये व्यस्त असल्याने कामकाज ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कर भरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या खाली असल्याचे दिसून आले असून संबंधित कर्मचारी अनुपस्थित असल्याचे दृश्य नागरिकांच्या नजरेत भरले. त्यामुळे उपस्थित नागरिकांना ताटकळत थांबावे लागले.
विशेष म्हणजे, सध्या उन्हाळ्याचे तीव्र दिवस सुरू असताना नागरिकांना उष्णतेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांचा त्रास अधिकच वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आणि संताप व्यक्त केला जात असून, संबंधित प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन कामकाज सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.तसेच, अशा गर्दीच्या काळात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन करून नागरिकांना वेळेवर सेवा द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




