पालकमंत्री मा.ना.इंद्रनील नाईक यांच्या कडून शुभेच्छा संदेश…
देवरी,दि.३१- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा बीजेपार येथील विद्यार्थिनी अल्का रामदास मरसकोल्हे हिने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ८०० मीटर धावणे आणि ४×४०० मीटर रिले स्पर्धेसाठी तिची पहिल्या ट्रायबल ‘खेलो इंडिया’ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेच्या पात्रता फेऱ्या पालघर व झारखंडमधील रांची येथे पार पडल्या. या दोन्ही फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत अल्काने मुख्य स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. तिच्या या यशामुळे गोंदिया जिल्ह्याचा तसेच महाराष्ट्राचा मान उंचावला आहे.
अल्का हिच्या या यशाबद्दल महाराष्ट्राचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन तसेच मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी अभिनंदन केले आहे. त्यांनी शुभेच्छा संदेशात अलकाच्या चिकाटी, मेहनत आणि क्रीडाकौशल्याचे कौतुक करत हे यश केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण आदिवासी समाजासाठी व राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले आहे.
‘एक आश्रमशाळा एक खेळ’ या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली बिजेपार आश्रमशाळेत मिळालेले विशेष प्रशिक्षण, संतुलित आहार व पुरेसे क्रीडा साहित्य यामुळे हे यश शक्य झाल्याचे सांगितले जात आहे. या यशामागे प्रकल्प अधिकारी श्री. उमेश काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा समन्वयक श्री. तुलसीदास बघाडे व मुख्याध्यापक श्री. अशोक इस्कापे यांचे नियोजन व समर्पण महत्त्वाचे ठरले. अल्काने आपल्या या उल्लेखनीय यशाचे श्रेय आई-वडील तसेच क्रीडा प्रशिक्षक श्री. महेंद्र कचलाम यांना दिले आहे.
अल्का मरसकोल्हे हिच्या या यशामुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात, आदिवासी समाजात तसेच आश्रमशाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून तिच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




