गोंदिया: तिरोडा तालुक्यातील बेरडीपार (काचेवानी) येथे आज, शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गावाशेजारील तलावात कन्हैय्या विसर्जन करण्यासाठी गेलेल्या कार्तिक प्यारेलाल गौतम (वय ३४) या जवानाचा तलावात बुडून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक हे भारतीय सैन्यात कार्यरत असून सध्या सुट्टीवर घरी आले होते. शनिवारी सायंकाळी गावातील तलावात कन्हैय्या विसर्जन करत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खोल पाण्यात गेले. पाण्यात बुडाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेऊन शोधकार्य सुरू केले. काही वेळातच त्यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. सुट्टीवर आलेल्या जवानाचा असा अचानक दुर्दैवी अंत झाल्याने गौतम कुटुंबासह संपूर्ण बेरडीपार आणि परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.





