मुंबई:-राज्यातील १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवार २ मे रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर, विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता ऑनलाईन वेबसाटईवर पाहता येणार आहे. काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर, राज्यातील १२ वी बोर्ड परिक्षेच्या निकालाच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वी च्या परीक्षेला 14 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल शनिवार, दिनांक 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. सदर निकाल अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपला आसन क्रमांक व इतर आवश्यक तपशीलांच्या आधारे निकाल पाहता येईल. यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी शनिवार, 2 मे रोजी सकाळी 11 वाजता राज्य मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. बारावीचा निकाल शनिवारी जाहीर होणार असून सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामध्ये, राज्याचा निकाल, कोणत्या विभागात किती निकाल लागला आणि एकूण विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने निकाल जाहीर होईल. त्यानंतर, दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. mahahsscboard.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.





