25.3 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home Top News विषारी दारूमुळे पिंपरी चिंचवड भागात १२ निष्पाप नागरिकांचा मृत्यू

विषारी दारूमुळे पिंपरी चिंचवड भागात १२ निष्पाप नागरिकांचा मृत्यू

0
39
पुणे,दि.२९ः पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात गेल्या ४८ तासांत झालेल्या लागोपाठ आणि गूढ मृत्यूंचे रहस्य अखेर उकलले आहे. या मृत्यूंमागे कोणताही नैसर्गिक आजार नसून, उरुळी कांचनमध्ये तयार झालेली अत्यंत घातक केमिकलयुक्त बनावट दारूच काळाचा घाला ठरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या विषारी दारूच्या थैमानामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून तब्बल १२ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार योगेश वानखेडे याने हे जीवघेणे ‘विष’ शहरात वितरीत केल्याचे समोर आले असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पवार म्हणाल्या, पुणे शहरातील हडपसर तसेच पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाला कठोर कारवाई करून या दुर्घटनेच्या मुळाशी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सखोल चौकशी करून आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. चौकशीअंती नियमानुसार गुन्हा दाखल करून योग्य ती कठोर कारवाई केली जाईल.
उरुळी कांचनमध्ये बनले जीवघेणे ‘विष’
मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही गावठी दारू अत्यंत बेकायदेशीरपणे तयार करण्यात आली होती. दारूची नशा आणि तीव्रता वाढवण्यासाठी मुख्य आरोपी योगेश वानखेडे याने यामध्ये तब्बल २१५ लीटर घातक ‘मिथेनॉल’ (केमिकलयुक्त विषारी स्पिरिट) मिसळले. हे अत्यंत विषारी रसायन मिश्रित करून त्याने ही दारू पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध बेकायदेशीर दारू अड्ड्यांवर (गुत्त्यांवर) विक्रीसाठी पाठवली. ही दारू प्यायल्यानंतर अनेक नागरिकांना तीव्र विषबाधा झाली आणि एकापाठोपाठ एक अशा १२ जणांना प्राण गमवावे लागले.

blank