गोंदिया,दि.०५ : नीट आणि टीईटी परीक्षांच्या कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ गोंदिया शहरात एनएसयूआयच्या वतीने खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या नेतृत्वाखाली 4 जुलै रोजी आंदोलन करण्यात आले. शहरातील जयस्तंभ चौकात विद्यार्थी व एनएसयूआय कार्यकर्त्यांनी एकत्र येत शिक्षणमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केंद्र सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांना न्याय मिळाले पाहिजे.मागील काही वर्षांत विविध स्पर्धा व प्रवेश परीक्षांच्या पेपरफुटीच्या अनेक घटना समोर आल्या असून त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. देशातील विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास टिकवण्यासाठी पंतप्रधानांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, असेही ते म्हणाले.या आंदोलनात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, माजी आमदार दिलीप बनसोडे, APMC उपसभापती राजकुमार (पप्पूभाऊ) पटले, विशाल अग्रवाल, NSUI गोंदिया जिल्हाध्यक्ष अमन मेमन, माजी NSUI जिल्हा सचिव गौरव बिसेन यांच्यासह काँग्रेस व NSUI चे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.





