25.1 C
Gondiā
Monday, August 24, 2026
Home राजकीय इतर समाजाचे आरक्षण घालवण्याचा मनोज जरांगेंचा डाव

इतर समाजाचे आरक्षण घालवण्याचा मनोज जरांगेंचा डाव

0
6
नागपूर,दिनांक २४ ऑगस्ट –मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे ठिकाण अंतरवाली सराटी ठेवावे की मुंबईतील आझाद मैदान, हा त्यांचा प्रश्न असला तरी आंदोलनाच्या नावाखाली मुंबईसह संपूर्ण राज्यातील जनतेला वेठीस धरणे योग्य नाही, अशी घणाघाती टीका बहुजन समाज पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ.ऍड.संदीप ताजने यांनी सोमवारी (ता.२४) केली. जरांगेचे आंदोलन हे केवळ इतर समाजाचे आरक्षण घालवण्यासाठी आहे का? असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

“मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे; मात्र ते देताना ओबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांवर कुठलीही गदा येता कामा नये. एका समाजाच्या न्याय्य मागणीचे समर्थन करताना दुसऱ्या समाजाच्या आरक्षणावर अन्याय करणे हा सामाजिक न्यायाचा मार्ग असू शकत नाही,” असे डॉ.ऍड.ताजने यांनी स्पष्ट केले.

आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांनी आरक्षणाचा इतिहास आणि त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महापुरुषांच्या विचारांचा गांभीर्याने अभ्यास करावा, असे आवाहनही त्यांनी केले. घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका दर्शविल्याचा दाखला देत, पंजाबराव देशमुख आणि डॉ.आंबेडकर यांच्या भेटीच्या संदर्भातून हा इतिहास समोर येतो; असे डॉ.ऍड.ताजने म्हणाले. पंरतु, या संपूर्ण आंदोलनात आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले तसेच डॉ.बाबासाहेबांच्या विचारांचे कुठलेही वैचारिक समर्थन आंदोलकांकडून होत असल्याचे दिसून येत नाही.

“राज्यात आतापर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री सत्तेवर आले. त्यांनी आरक्षणाचा प्रश्न निर्णायकपणे सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले? याचाही आत्मपरीक्षणाने विचार झाला पाहिजे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. विद्यमान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांबद्दल अवाच्य भाषा वापरणे हा आंदोलनाचा मार्ग नसून लोकशाही मूल्यांचा अवमान आहे. आरक्षण हवे असेल तर संविधानाच्या चौकटीत लढा द्या; जनतेला वेठीस धरून नव्हे, असा थेट इशाराच डॉ.ऍड.ताजने यांनी दिला.