भंडारा, 8:भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील पालडोंगरी आणि भंडारा तालुक्यातील आमगाव (दि.) या गावांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेअंतर्गत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान (सन २०२५-२६) अंतर्गत विभागीय तपासणी मंगळवारी पार पडली. अतिरिक्त आयुक्त (आस्थापना) श्री. इलमे आणि अतिरिक्त आयुक्त (विकास) सौ. वर्षा गौरकर यांच्या नेतृत्वाखालील समितीने दोन्ही गावांतील स्वच्छता, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवा तसेच ग्रामपंचायतीने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची सखोल पाहणी करून ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
विभागीय तपासणी समितीचे अध्यक्ष तथा अप्पर आयुक्त (आस्था.) विवेक इलमे, समितीच्या सदस्य सचिव तथा अप्पर आयुक्त (विकास) वर्षा गौरकर, सहायक अमोल महल्ले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) माणिक चव्हाण, गटविकास अधिकारी सतिश लिल्हारे, गट विकास अधिकारी प्रमोद हुमने, सहायक गट विकास अधिकारी गिरीधर सिंगनजुडे, जिल्हा कक्षाचे अजय गजापूरे, विस्तार अधिकारी नूतन बिसेन, भीमगिरी बोदले, पडोळे, सरपंच प्रकाश खराबे, सरपंच सौ. ग्राम पंचायत पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
समितीने पालडोंगरी येथे सर्वप्रथम स्मशानभूमी परिसराला भेट देऊन तेथे उभारण्यात आलेल्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केली. कचरा वर्गीकरण शेड, गांडूळखत प्रकल्प, बालोद्यान, सार्वजनिक शौचालय तसेच परिसरातील वृक्षलागवडीची माहिती घेतली. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून विविध वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता सुविधांची पाहणी करण्यात आली. धोबीघाट, शोषखड्डे, घरगुती नळजोडणी, वॉटर मीटर व्यवस्था तसेच मासे पैदास केंद्र परिसराचीही तपासणी करण्यात आली. समितीने गावातील विहिरींची पाहणी करून पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. शाळा व अंगणवाडी केंद्रांना भेट देत विद्यार्थी आणि चिमुकल्यांशी संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा, वाचनाचा तसेच विविध विषयांवरील ज्ञानाचा आढावा घेण्यात आला. अंगणवाडीतील पोषण आहार, स्वयंपाकगृह, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांची पाहणी करण्यात आली.
या ग्रामपंचायत स्तरावर समितीने पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला बचतगट, शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांशी चर्चा करून गावातील स्वच्छता, आरोग्य, रोजगारनिर्मिती व विकासकामांचा आढावा घेतला. गावातील पूर्वीची व सध्याची परिस्थिती, झालेला बदल आणि ग्रामस्थांचा सहभाग याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. ग्रामपंचायत अधिकारी सौ. भारती मुरकुटे यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची तसेच नाविन्यपूर्ण संकल्पनांची माहिती समितीला दिली. कार्यक्रमाच्या शेवटी प्लास्टिकमुक्त गाव संकल्पनेला चालना देण्यासाठी समिती सदस्यांना कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले.
त्यानंतर समितीने भंडारा तालुक्यातील आमगाव (दि.) येथे भेट दिली. ग्रामपंचायतीतर्फे समितीचे स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत अधिकारी श्री. भिवगडे व विस्तार अधिकारी श्री. पडोळे यांनी गावात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली, तर उपसरपंच श्री. लक्ष्मण गायधने यांनी गावातील विकासकामांचा आढावा मांडला. समितीने घरगुती नळजोडणी, शौचालये, विविध करांची वसुली, ग्रामपंचायत परिसरातील रोपवाटिका आणि विविध वृक्षांच्या बियाण्यांपासून तयार करण्यात आलेल्या रोपवाटीका नाविन्यपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली. आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन उपलब्ध सुविधांची माहिती घेतली.
जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी लेझीमच्या माध्यमातून समितीचे स्वागत केले. समितीचे अध्यक्ष विवेक इलमे यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी शैक्षणिक विषयांवर चर्चा केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची माहिती घेतली. यावेळी विद्यार्थिनींनी कविता सादर केली. समितीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, सार्वजनिक वाचनालय तसेच अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बाजार चौकातील पूर्वीच्या अस्वच्छ जागेवर विकसित करण्यात आलेल्या रोपवाटिकेची, वृक्षलागवडीची तसेच सार्वजनिक शौचालयाची पाहणी केली.





