27 C
Gondiā
Wednesday, July 8, 2026
Home Top News पालखी प्रस्थानानिमित्त ११ जुलै रोजी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; जड-अवजड वाहनांसह अंतर्गत...

पालखी प्रस्थानानिमित्त ११ जुलै रोजी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; जड-अवजड वाहनांसह अंतर्गत वाहतुकीवर निर्बंध

0
6
संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानानिमित्त शनिवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी पुणे शहरात विशेष वाहतूक व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. वारकऱ्यांची मोठी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक सुरक्षित, सुरळीत आणि नियोजनबद्ध राहावी यासाठी पोलीस उपआयुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी तात्पुरते वाहतूक निर्बंध लागू केले आहेत.
संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातून रामोशी गेट, भवानी माता मंदिर, मुक्ती फौज चौक, पुलगेट, मम्मादेवी चौक, सोलापूर रस्ता, हडपसर गाडीतळ मार्गे दिवेघाट–सासवडकडे प्रस्थान करणार आहे. तर संत श्री तुकाराम महाराजांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरातून अरुणा चौक, समाधान चौक, पिंपरी चौक, ए.डी. कॅम्प, रामोशी गेट, भवानी माता मंदिर, पुलगेट, सोलापूर रस्ता मार्गे लोणी काळभोर येथे मुक्काम करून १२ जुलै रोजी पहाटे यवतमार्गे पंढरपूरकडे रवाना होणार आहे.
शनिवार, दि. ११ जुलै रोजी पहाटे २.०० वाजल्यापासून पालख्या पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीबाहेर जाईपर्यंत पालखी मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येईल. अत्यावश्यक सेवांची वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस, इंधन वाहतूक तसेच लग्नसमारंभातील वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
या कालावधीत संत कबीर चौक–बेलबाग चौक तसेच संत कबीर चौक–रामोशी गेट चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार असून, वाहनचालकांनी रास्ता पेठ पॉवर हाऊस, जिजामाता चौक, फडके हौद, देवजीबाबा चौक आणि हमजेखान चौक या पर्यायी मार्गांचा वापर करावा.
याशिवाय गोळीबार मैदान, सम्राट चौक, सेंट मेरीज परिसर, एम.जी. रोड, रामोशी गेट चौक, मनोरा चौक, भैरोबानाला चौक, जांभुळकर चौक, फातिमा नगर चौक तसेच बी.टी. कवडे रोड, रामटेकडी, वैदुवाडी, मगरपट्टा (मुंढवा), हडपसर, सिरम फाटा, सोलापूर रोड, मंतरवाडी फाटा, सासवड खडीमशीन चौक आणि बोपदेव घाट परिसरातील रस्त्यांवर आवश्यकतेनुसार वाहतूक बंद किंवा वळविण्यात येणार आहे.
हडपसर–सोलापूर रोड हा मार्ग पहाटे २.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील. या मार्गावरील वाहनांनी खराडी बायपास–वाघोली मार्गे नगर रोड या पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच पालखी सासवड येथे मुक्कामासाठी पोहोचेपर्यंत दिवेघाट आणि बोपदेव घाट या दिशेने कोणतेही वाहन सोडण्यात येणार नसून, वाहने खडीमशीन चौक–कात्रज मार्गे वळविण्यात येतील.
पालखी मार्गावरून पालखी पुढे सरकत गेल्यानंतर संबंधित रस्ते टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुले करण्यात येतील. तसेच वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूंना व छेदणाऱ्या उपरस्त्यांवरील आतल्या १०० मीटर परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांच्या पार्किंगस तात्पुरता प्रतिबंध करण्यात आला आहे.
पुण्याकडून सासवडकडे जाणाऱ्या पालखीसोबतच्या वाहनांनी भैरोबानाला चौक–लुल्लानगर चौक–कोंढवा खडीमशीन चौक–बोपदेव घाट या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने नागरिकांना केले आहे.
यासंबंधी अधिक माहितीसाठी वाहतूक मुख्य नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्र. 2668500 व 26684000 वर संपर्क साधावा, असे पालीस उपआयुक्त, वाहतूक, पुणे शहर यांनी कळविले आहे.