25.9 C
Gondiā
Thursday, July 9, 2026
Home राजकीय राज्यातील सर्व सरकारी विभागांमधील बहुजनांसाठी राखीव जागा तात्काळ भरा!

राज्यातील सर्व सरकारी विभागांमधील बहुजनांसाठी राखीव जागा तात्काळ भरा!

0
6
बसपचे माजी प्रदेशाध्यक्ष, बहुजन नेते ऍड.संदीप ताजने यांची मागणी 

नागपूर-राज्यातील विविध शासकीय, निमशासकीय विभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग प्रवर्गातील शेकडो पदे रिक्त आहेत. बहुजन समाजातील सुशिक्षत तरुण रोजगारासाठी वणवण फिरत असताना, हक्काच्या आरक्षित जागा वर्षांनुवर्षे रिक्त ठेवल्या जात असल्याबद्दल बहुजन समाज पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि बहुजन नेते ऍड.संदीप ताजने यांनी तीव्र संपात व्यक्त केला आहे. या सर्व जागा तात्काळ भरण्यासाठी सरकारने मेगा भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी आग्रही मागणी करीत बहुजनांनी यासाठी एकत्रित येण्याचे आवाहन ऍड.ताजने यांनी केले आहे.

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ नुसार समोर आलेल्या माहितीनूसार नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रोद्योगिकी संस्थान अर्थात व्हीएनआयटी येथे प्राध्यापक व इतर संवर्गात मागासवर्गीयांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याची आकडेवारी समोर आली आहे.आकडेवारीनूसार ‘एससी’साठी नियमानुसार मंजूर ४८ जागांपैकी केवळ २८ जागा भरल्या गेल्या असून तब्बल २० जागा (४१.६७%) रिक्त आहेत. ‘एसटी’साठी मंजूर २३ पैकी ९ जागा भरल्या असून १४ जागा (६०.८७%) रिक्त आहे.तर, ‘ओबीसी’साठी ८९ जागांपैकी ४३3 जागा भरल्या असून ४६ जागा (५१.६९%) रिक्त आहेत.

केंद्रीय शैक्षणिक संस्था (शिक्षकांच्या केडरमधील आरक्षण) कायदा, २०१९ लागू झाल्यानंतरही राष्ट्रीय स्तरावरील आणि राज्यातील शैक्षणिक व प्रशासकीय संस्थांमध्ये मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व अत्यंत नगण्य ठेवले गेले आहे. व्हीएनआयटीसारख्या नामांकित संस्थेत जर अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींच्या ५० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त असतील, तर राज्यातील इतर सरकारी विभागांची परिस्थिती याहून भयानक असल्याचे ऍड.ताजने म्हणाले. 

राज्य शासनाच्या विविध ६५ हून अधिक विभागांमध्ये मागासवर्गीयांचा मोठा अनुशेष (Backlog) प्रलंबित आहे. यामुळे बहुजन समाजातील लाखो पात्र आणि गुणवंत उमेदवार वयोमर्यादा संपण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. राज्यातील सर्व विभागांमधील SC, ST आणि OBC प्रवर्गाच्या रिक्त जागांचा अनुशेष तात्काळ विशेष मोहिमेद्वारे भरण्यात यावा.कंत्राटी नोकरभरती बंद करून सर्व रिक्त जागांवर कायमस्वरूपी ‘मेगा भरती’ प्रक्रिया तात्काळ सुरू करावी आणि प्रत्येक विभागाची सुधारित ‘बिंदू नामावली’ (Roster Register) सार्वजनिक करून पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी यानिमित्ताने ऍड.ताजने यांनी केली आहे.