30.2 C
Gondiā
Saturday, July 11, 2026
Home विदर्भ ‘देववृक्ष लागवड अभियान’ अंतर्गत गोरेगाव येथे वृक्षारोपण; माऊली महिला बचत गटाचा सहभाग

‘देववृक्ष लागवड अभियान’ अंतर्गत गोरेगाव येथे वृक्षारोपण; माऊली महिला बचत गटाचा सहभाग

0
12

गोरेगाव:पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंपदा वाढविण्याच्या उद्देशाने अनुलोम संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘देववृक्ष लागवड अभियान’ अंतर्गत गोरेगाव येथे नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले.हा कार्यक्रम शुक्रवार, दि. 10 जुलै रोजी गोरेगाव, जि. गोंदिया येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमात माऊली महिला बचत गट, गोरेगाव यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या वेळी अनुलोमच्या संवादिनी वर्षा जनबंधू या उपस्थित होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनुलोम सखी दिपा राऊत, माऊली महिला बचत गटाच्या अध्यक्षा उषाताई शहारे, सचिव बारापत्रे ताई तसेच बचत गटातील सर्व महिला सदस्यांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला.वृक्षारोपणानंतर मार्गदर्शन करताना वर्षा जनबंधू म्हणाल्या, “आजच्या काळात वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि पाण्याची टंचाई यावर एकमेव उपाय म्हणजे वृक्षलागवड. प्रत्येकाने आपल्या घराजवळ, गावात किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. देववृक्ष हे केवळ झाड नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठीचा वारसा आहे.”

माऊली महिला बचत गटाच्या अध्यक्षा उषाताई शहारे यांनी अनुलोमच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि यापुढेही गावात अशा प्रकारचे पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यास आमचा पूर्ण पाठिंबा राहील असे सांगितले.या वृक्षारोपणामुळे परिसरात हरितछटा वाढण्यास मदत होणार असून स्थानिक महिलांच्या सहभागामुळे हा उपक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनुलोमच्या सर्व पदाधिकारी व माऊली महिला बचत गटाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.