25.9 C
Gondiā
Wednesday, August 26, 2026
Home विदर्भ मोठ्या आस्थापनांमध्ये अग्निशमनाबाबत व्यापक मोहिम हाती घेणार-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

मोठ्या आस्थापनांमध्ये अग्निशमनाबाबत व्यापक मोहिम हाती घेणार-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

0
6
अमरावती, दि. 26 : जिल्हा स्त्री रूग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मोठ्या आस्थापनांमध्ये अग्निशमन यंत्रणा असावी, यासाठी पाहणी करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या गर्दीच्या ठिकाणी आगीचा प्रकार घडू नये, यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज फायर ऑडीट आणि फायर सेफ्टी ऑडीट, इतर उपाययोजनांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, जिल्हा स्त्री रूग्णालयात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उपायायोजना करण्यावर भर दिला. यासाठी जिल्ह्यातील सर्व मोठ्या आस्थापना आणि शासकीस कार्यालयांची येत्या आठ दिवसांत पाहणी करावी. यात प्रामुख्याने अग्निशमनाबाबत उपाययोजना सुचविण्यात याव्यात. तसेच या सूचना पुढील आठ दिवसात अंमलात आणाव्यात. यासाठी आस्थापनांना जबाबदार धरून त्यांच्याकडून अग्निशमन यंत्रणांची दुरूस्ती, देखभाल आवश्यक असलेल्या ठिकाणी नवीन यंत्रणा बसविण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत राखण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण दर महिन्याला देण्यात यावे. तसेच ही यंत्रणा संबंधित आस्थापनांना सोपविताना जबाबदारी निश्चित करण्यात यावी. जोखमीच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा स्वयंचलित मोडमध्ये ठेवण्यात यावी. तसेच याची नियमित देखभाल आणि दुरूस्ती करण्यावर भर देण्यात यावा. यात प्रामुख्याने स्वयंचलित यंत्रणा कार्यक्षम असल्याची खात्री करावी. अग्निशमन यंत्र वापराबाबत प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात यावे. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी याचे प्रात्यक्षिक घेण्यात यावे. यातील सुरक्षा विषयक कामांमध्ये कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही.
रूग्णालयात विजेच्या नियंत्रित वापरावर असलेल्या वैद्यकीय उपकरणांना स्टॅबिलायझर जोडण्यात यावेत. तसेच स्मोक डिटेक्टर कार्यान्वीत होण्यासाठी या यंत्रणेची नियमीत देखभाल करण्यात यावी. मोठ्या ठिकाणी आवश्यकतेनुसार फायर सिलींडर, होज पाईप किंवा स्प्रिंकलर व्यवस्था करण्यात यावी. अग्निशमन यंत्रणेच्या पाहणीसाठी शहरी भागात 50 आणि ग्रामीण भागात 50 टिम तयार करण्यात येतील. त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार अग्निशमनाबाबत सुधारणा करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सांगितले.