30.8 C
Gondiā
Sunday, July 12, 2026
Home विदर्भ सखी वन स्टॉप सेंटरच्या मदतीने बिहार आणि भुसावळ बेपत्ता महिला 1 महिन्यानंतर...

सखी वन स्टॉप सेंटरच्या मदतीने बिहार आणि भुसावळ बेपत्ता महिला 1 महिन्यानंतर सुखरूप घरी; समुपदेशकांच्या प्रयत्नांना यश

0
4
गोंदिया:- गोंदिया येथील सखी वन स्टॉप सेंटरच्या संवेदनशील आणि जलद कार्यवाहीमुळे बिहार आणि भुसावळ येथील गेल्या 1 महिन्यापासून बेपत्ता असलेल्या दोन महिला आता सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचल्या आहेत. जिल्हा महिला व बालविकास विभागांतर्गत के.टी.एस रुग्णालयात 24×7 कार्यरत असलेल्या या केंद्राने पुन्हा एकदा आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.
बिहारच्या रिंकूदेवीचा रावणवाडीत शोध
बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यातील 40 वर्षीय रिंकूदेवी राजकुमार साव या मागील 1 महिन्यापासून बेपत्ता होत्या. कुटुंबीय त्यांचा सर्वत्र शोध घेत होते. 4 जुलै 2026 रोजी गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी गावाजवळ एक महिला एकट्याने भरकटत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी तातडीने 112 क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रिंकूदेवी यांना ताब्यात घेतले आणि पुढील संरक्षणासाठी त्यांना सखी वन स्टॉप सेंटर, गोंदिया येथे दाखल केले.
भुसावळच्या रेखा राठोड रामनगरमध्ये आढळल्या
दुसरी घटना रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील आहे. 20 जून 2026 रोजी रात्री पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना भुसावळ जिल्ह्यातील रेखा तुकडीदास राठोड या महिला आढळल्या. त्या मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याने आणि व्यवस्थित माहिती न देऊ शकल्याने पोलिसांनी काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीने त्यांना सखी वन स्टॉप सेंटरमध्ये दाखल केले.
समुपदेशनातून कुटुंबीयांपर्यंत संपर्क
सखी केंद्रातील समुपदेशकांनी दोन्ही महिलांशी संवाद साधून त्यांची संपूर्ण माहिती घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन संपर्क साधला. कुटुंबीयांनी सांगितले की ते गेल्या 1 महिन्यापासून महिलांचा शोध घेत होते. 5 जुलै रोजी बिहारमधील रिंकूदेवी यांचे कुटुंबीय सखी केंद्रात दाखल झाले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून केंद्रप्रशासक मधु बिसेन आणि कर्मचाऱ्यांनी रिंकूदेवी यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. त्याचप्रमाणे भुसावळच्या रेखा राठोड यांनाही त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. सखी केंद्राच्या मदतीने दोन्ही महिला आता सुरक्षितपणे घरी पोहोचल्या आहेत.
कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य
या संपूर्ण कार्यात केंद्रप्रशासक मधु बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली वैशाली सांगाडे, लीना बुराडे, काजोल करवाडे, भूषण भेलावे, सविन राऊतकर, प्रीती नागरीकर, श्रद्धा कोडे आणि दुर्गा बेबाम यांनी मोलाचे सहकार्य केले.
सखी केंद्राची भूमिका
सखी वन स्टॉप सेंटर, गोंदिया हे हिंसा, अपघात किंवा बेपत्ता झालेल्या महिलांना 24×7 मोफत मदत, समुपदेशन, पोलीस मदत, वैद्यकीय आणि कायदेशीर सहाय्य पुरवते. हे केंद्र जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि परिविक्षा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. नागरिकांना आवाहन आहे की अशा बेवारस महिलांना पाहिल्यास तातडीने 112 किंवा 181 हेल्पलाइनवर संपर्क साधावा.