25.2 C
Gondiā
Monday, July 13, 2026
Home गुन्हेवार्ता एम.आर.जी.एस. भरतीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; नागपूरच्या प्लेसमेंट एजन्सी संचालकावर कारवाईची मागणी

एम.आर.जी.एस. भरतीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; नागपूरच्या प्लेसमेंट एजन्सी संचालकावर कारवाईची मागणी

0
2

गोंदिया:महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGS/MRGS) सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार गोंदियात उघडकीस आला आहे. नागपूर येथील एका नामांकित प्लेसमेंट एजन्सीच्या संचालकाने हा गंडा घातल्याचा आरोप असून, या प्रकरणी दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील फुलचूर येथील रहिवासी प्रसाद वसंत वेरूळकर यांनी ११ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत हा खळबळजनक आरोप केला.

नेमके काय आहे प्रकरण?

तक्रारदार प्रसाद वेरूळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दोन ते तीन वर्षांपूर्वी त्यांचा नागपूर येथील ‘अॅड्रोइट जॉब प्लेसमेंट’ (Adroit Job Placement) या एजन्सीशी संपर्क आला होता. एजन्सीच्या संचालकाने ‘एम.आर.जी.एस.’ अंतर्गत ए.पी.ओ. (APO), पी.टी.ओ. (PTO), सिव्हिल इंजिनिअर आणि शिपाई अशा विविध पदांची शासकीय भरती सुरू असल्याचे सांगितले. या जागांवर थेट नियुक्ती करून देण्याच्या नावाखाली उमेदवारांकडून मोठ्या रक्कमेची मागणी करण्यात आली.

एजन्सीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून तक्रारदाराने काही उमेदवारांचे बायोडाटा गोळा करून एजन्सीकडे पाठवले. त्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांत बँक खात्यांद्वारे सुमारे ३ लाख रुपयांची रक्कम एजन्सीला ट्रान्सफर करण्यात आली.

निवडणुका आणि टेंडरचे कारण देत वेळकाढूपणा

पैसे देऊनही अनेक महिने उलटल्यानंतरही एकाही उमेदवाराला नियुक्ती पत्र मिळाले नाही. याबाबत तक्रारदाराने एजन्सीकडे वारंवार विचारणा केली असता, संचालकाकडून कधी निवडणुका, कधी टेंडर प्रक्रिया तर कधी मंजुरी आणि पेमेंट खोळंबल्याची कारणे पुढे करून वेळकाढूपणा करण्यात आला. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदाराने आपले पैसे परत मागितले. मात्र, पैसे परत करण्यास स्पष्ट नकार देत, “जे करायचे ते करा, एक रुपयाही परत करणार नाही,” अशी धमकीवजा भूमिका एजन्सीच्या संचालकाने घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचा उल्लेख; संशय वाढला

या संपूर्ण गैरव्यवहारात ‘एम.आर.जी.एस.’ भरती, ‘एस-२ इन्फोटेक’ (S2 Infotech) तसेच थेट मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचा (Sign) उल्लेख करण्यात आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. शासकीय यंत्रणेच्या नावाचा वापर करून हा मोठा घोटाळा करण्यात आल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे.

पुराव्यांसह पोलिसांत धाव घेणार

या आर्थिक फसवणुकीप्रकरणी तक्रारदाराने संबंधित उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. “या व्यवहाराशी संबंधित सर्व बँक स्टेटमेंट, व्हॉट्सअॅप चॅट्स, मेसेजेस आणि कॉल रेकॉर्डिंगचे सबळ पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत. हे सर्व पुरावे पोलिसांकडे सादर करून संबंधित प्लेसमेंट एजन्सीच्या संचालकाविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी प्रसाद वेरूळकर यांनी केली आहे. या प्रकरणामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण वर्गात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.