नागपूर:उपराजधानीत गुन्हेगारांचे मनोबल पुन्हा एकदा उंचावले आहे की काय, असा संतापजनक सवाल नागपूरकर विचारत आहेत. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘सोमरस बार’बाहेर एका सराईत गुंडावर डोळ्यात तिखट फेकून सात जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला चढवला. या रक्तरंजित खेळात गंभीर जखमी झालेल्या अक्षय वंजारी या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
दुसरीकडे, कळमना भागात दारूच्या नशेत भावा-भावांमध्ये झालेल्या प्राणघातक वादात लहान भावाने मोठ्या भावाचा चाकूने भोसकून खून केल्याची दुसरी थरारक घटना घडली आहे. अवघ्या चोवीस तासांत घडलेल्या या दोन भीषण हत्यांमुळे संपूर्ण नागपूर शहर पुनश्च एकदा हादरून गेले आहे.
पत्नीचा फोन आला अन् मृत्यूच्या जाळ्यात अडकला
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी अक्षय वंजारी हा नंदनवनमधील सोमरस बारमध्ये आपल्या काही मित्रांसोबत मद्यप्राशन करत बसला होता. दरम्यान, त्याच्या मोबाईलवर पत्नीचा फोन आल्याने तो संवाद साधण्यासाठी बारच्या खाली रस्त्यावर आला.अक्षय बाहेर पडताच दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्या चेहऱ्यावर अचानक तिखट फेकून त्याला अंध केले. त्यानंतर प्रदीप आखरे, प्रशांत आखरे, सूरज लांजेवार आणि त्यांच्या साथीदारांनी धारदार चाकू आणि लोखंडी शस्त्रांनी त्याच्यावर सपासप वार केले. अक्षयचा मित्र अश्विन रहांगडाले याने मध्यस्थी करत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, हल्लेखोरांनी त्याच्यावरही हल्ला चढवला. घटनेनंतर गंभीर अवस्थेत अक्षयला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र बुधवारी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
‘पोलीस खबरी’ असल्याच्या संशयातून सूडचक्र
पोलीस तपासात दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, ही हत्या जुन्या वैमनस्यातून व सूडाच्या भावनेतून करण्यात आली आहे. आरोपी सूरज लांजेवार याच्या भावाला एका चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. ही टिप अक्षय वंजारी यानेच पोलिसांना दिली होती, असा संशय लांजेवार टोळीला होता. याच संशयाची होरपळ अखेर अक्षयच्या जीवघेण्या हत्येत झाली.
नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी एकूण सात आरोपींवर गुन्हे दाखल केले असून:सूरज लांजेवार,वंदना लांजेवार,प्रशांत आखरे,हार्दिक पालनकर या चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर उर्वरित तीन फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक ठिकठिकाणी छापे मारत आहे.
कळमन्यात दारूच्या पैशांवरून भावाचीच हत्या
हत्येची दुसरी घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मोठ्या भावाने घरात तुफान गोंधळ घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या दररोजच्या त्रासाला कंटाळून आणि रागाच्या भरात लहान भावाने मोठ्या भावावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या २१ वर्षीय तरुणाचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.एकाच दिवशी घडलेल्या या दोन लागोपाठच्या भीषण घटनांमुळे नागपूर पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, गुन्हेगारांवर वचक बसवणे हे आता शहर पोलिसांपुढील मुख्य आव्हान ठरणार आहे.





