31.3 C
Gondiā
Thursday, July 16, 2026
Home गुन्हेवार्ता कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी; अल्पवयीन मुलीवर दीड वर्ष लैंगिक...

कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी; अल्पवयीन मुलीवर दीड वर्ष लैंगिक अत्याचार, पोक्सोअंतर्गत गुन्हा

0
4
नागपूर : कपडे बदलत असताना अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ चित्रीत करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर तब्बल दीड वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश प्रेमदास मालखेडे (वय ३८, रा. मेंढला, नरखेड) असे आरोपीचे नाव आहे. तो हुडकेश्वरमधील जानकीनगर परिसरात युनियन बँकेमागे वास्तव्यास होता.तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी बचतगट चालवत होती. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने या बचतगटामार्फत कर्ज घेतल्यामुळे दोन्ही कुटुंबांची ओळख झाली. बचतगटाच्या कलेक्शनची रक्कम जमा करण्यासाठी अल्पवयीन मुलगी नेहमी आरोपीच्या घरी जात होती.
काही दिवसांपूर्वी आरोपीची पत्नी आजारी पडल्याने पीडित मुलगी व तिच्या आईने रुग्णालयात तिची देखभाल केली होती. त्यानंतर घरातील कामांसाठीही अल्पवयीन मुलगी आरोपीच्या घरी अनेकदा ये-जा करत होती.पोलिसांच्या माहितीनुसार, याच काळात मुलगी कपडे बदलत असताना आरोपीने तिचा व्हिडिओ चित्रीत केला. त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. व्हिडिओची भीती दाखवून तो अल्पवयीन मुलीला वारंवार आपल्या घरी बोलावत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, सप्टेंबर २०२४ ते जुलै २०२६ या कालावधीत आरोपीने तिच्यावर सातत्याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने आपल्या आईकडे संपूर्ण आपबीती कथन केली. त्यानंतर कुटुंबीयांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रारीच्या आधारे हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.