24.8 C
Gondiā
Tuesday, July 21, 2026
Home रोजगार/व्यापार बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी प्रकल्प आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण उत्साहात

बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी प्रकल्प आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण उत्साहात

0
20
वाशिम, दि. 20 जुलै  : राज्य शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) २.० अंतर्गत महिला बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना कृषी व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळावा, या उद्देशाने सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याबाबत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र, वाशिम येथे उत्साहात पार पडला.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकल्प संचालक (आत्मा) अनिसा महाबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी महिला बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कृषीपूरक उद्योग, मूल्यवर्धन, कृषी यांत्रिकीकरण आणि सामूहिक उद्योजकतेच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधण्यासाठी दर्जेदार व व्यवहार्य प्रकल्प आराखडा तयार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सक्षम व सुयोग्य प्रकल्प आराखडा हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशिक्षणाचे प्रास्ताविक नोडल अधिकारी लक्ष्मण सावंत यांनी केले. त्यांनी प्रशिक्षणामागील उद्दिष्टे स्पष्ट करताना बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी योग्य नियोजनासह प्रकल्प तयार करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
सनदी लेखापाल मारोती भोयार यांनी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याची प्रक्रिया, आर्थिक व्यवहार्यता, बँक कर्जासाठी आवश्यक निकष, वित्तीय नियोजन तसेच कर्ज प्रस्ताव तयार करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा विकास व्यवस्थापक (नाबार्ड) शंकर कोकडवार यांनी कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत उपलब्ध कर्ज, अनुदान आणि व्याज सवलतींची माहिती देत या योजनेचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले.
अक्षय वैराळे यांनी कृषी औजार बँक उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक बाबी, यंत्रसामग्रीची निवड, व्यवस्थापन व कार्यपद्धती याविषयी माहिती दिली. तसेच पोकरा प्रकल्पातील प्रापण तज्ज्ञांनी शासकीय प्रापण प्रक्रियेतील नियम, कार्यपद्धती आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली.
प्रकल्प विशेषज्ञ (कृषी व्यवसाय) सोहम बेलोकर यांनी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याची पद्धत, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, प्रकल्प मंजुरीची कार्यपद्धती तसेच प्रस्ताव सादर करताना घ्यावयाची काळजी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. सहभागी प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
या प्रशिक्षणास जिल्ह्यातील विविध महिला बचत गटांचे प्रतिनिधी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे पदाधिकारी तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणामुळे सहभागी प्रतिनिधींना प्रकल्प आराखडा तयार करणे, आर्थिक नियोजन, बँक कर्ज, कृषी पायाभूत सुविधा निधी, कृषी औजार बँक तसेच प्रापण प्रक्रिया याविषयी उपयुक्त व व्यवहार्य मार्गदर्शन मिळाले.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प विशेषज्ञ (मनुष्यबळ विकास) प्रदीप पवार, राजेश कोकाट आणि रुपेश सरकटे यांनी विशेष सहकार्य केले.

blank