बिरसोला | दि. २५ जुलै २०२६-पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श विद्यालय, बिरसोला येथे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांचा, पालकांचा व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.या कार्यक्रमासाठी कैलास दंदरे व राधेश्याम बाहे यांच्या न्यू विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्था, बिरसोला यांच्या वतीने शाळेला विविध प्रकारची झाडे व कुंड्या भेट देण्यात आल्या. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सरोजनीताई दंदरे (सरपंच, बिरसोला) होत्या. प्रमुख अतिथी म्हणून केशव नागफासे (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती) उपस्थित होते. तसेच कतेलालजी मात्रे, राजेश दंदरे, रेखलाल पाचे, जगपाल नागफासे, बाबुलाल नागफासे व रविताताई पाचे यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी व वृक्षदिंडी काढून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. “झाडे लावा – जीवन वाचवा”, “वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी”, “वृक्ष लावा अंगणात, पसरेल समृद्धी जीवनात”, “झाडे आहेत कल्पतरू, संरक्षण त्यांचे नित्य करू”, “वृक्ष आमचा सगासोयरा, तोच आमचा मित्र खरा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर शालेय परिसर तसेच रस्त्याच्या कडेला विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. झाडे ही निसर्गाची अमूल्य देणगी असून ती शुद्ध प्राणवायू, स्वच्छ पर्यावरण, पाऊस आणि जैवविविधतेचे संरक्षण यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने झाडे लावून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
“एक व्यक्ती – एक वृक्ष” हा संकल्प स्वीकारून प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. वृक्षारोपण ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हरित व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक एस. एस. बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली चंदू दुर्गे, एन. एम. खोब्रागडे, पी. बी. रंगारी, कु. टी. एन. शेख, रितू नागफासे, सिंधू नागफासे व कैलास दंदरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
🌳 घोषवाक्य :
“एक व्यक्ती – एक वृक्ष, हरित भविष्याची हीच खरी दिशा!”
“झाडे लावा – जीवन वाचवा, वृक्षसंवर्धन करा – पर्यावरण जपा!”





