28.3 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home विदर्भ मांजराचे पिल्लू समजून घरी घेऊन आला शेतकरी बिबट्याचे दोन छावे; वन विभागाने...

मांजराचे पिल्लू समजून घरी घेऊन आला शेतकरी बिबट्याचे दोन छावे; वन विभागाने सुरक्षित जंगलात सोडले

0
15

गोंदिया:शेतात काम करत असताना सापडलेल्या दोन लहान पिल्लांना बिल्लीचे (मांंजराचे) पिल्लू समजून घरी घेऊन येणाऱ्या एका शेतकऱ्यामुळे परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली. अखेर वन विभागाच्या वेळेवर झालेल्या मध्यस्थीमुळे हे दोन्ही बिबट्याचे छावे सुखरूप आपल्या आईच्या कुशीत परतण्याची वाट पाहत आहेत. ही अनोखी घटना गोंदिया वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सोनेगाव/बीबी टोला परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनेगाव क्षेत्रातील एका शेतकऱ्याला आपल्या शेतात काम करत असताना दोन चिमुकली पिल्ले दिसून आली. दिसायला लहान असल्याने शेतकऱ्याने त्यांना मांजराची पिल्ले समजले आणि तो प्रेमाने त्यांना आपल्या घरी घेऊन आला. मात्र, काही वेळाने गावातील नागरिकांना या पिल्लांचा रंग आणि शरीररचना पाहून संशय आला. त्यांनी लागलीच याची माहिती वन विभागाला दिली.

घटनेची माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वन अधिकाऱ्यांनी दोन्ही पिल्लांची सखोल पाहणी केली असता, ते मांजराचे पिल्लू नसून बिबट्याचे छावे (मादी व नर) असल्याचे स्पष्ट झाले. वन विभागाने तात्काळ दोन्ही छाव्यांना सुरक्षितपणे आपल्या ताब्यात घेतले.

वन विभागाची विशेष मोहीम वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मादी बिबट्या (मादी बिबट) शिकारीच्या शोधात जाताना आपल्या लहान छाव्यांना शेतात किंवा सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवते. त्यामुळे या छाव्यांना पुन्हा त्यांच्या आईच्या स्वाधीन करण्यासाठी वन विभागाने त्यांना परत त्याच शेतात (ज्या ठिकाणाहून त्यांना उचलले होते) सुरक्षित ठेवले आहे, जेणेकरून मादी बिबट्या रात्रीच्या वेळी येऊन आपल्या छाव्यांना घेऊन जाऊ शकेल.सध्या दोन्ही छावे पूर्णपणे सुदृढ असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागातर्फे परिसरात कॅमेरे बसवून विशेष पाळत ठेवली जात आहे.

वन विभागाचे नागरिकांना आवाहन: “जंगलात किंवा शेतात वन्यजीवांचे छावे दिसून आल्यास त्यांना अजिबात हात लावू नये किंवा घरी घेऊन जाऊ नये. मानवाचा स्पर्श झाल्यास अनेकदा मादी बिबट्या आपल्या छाव्यांना स्वीकारत नाही. त्यामुळे असा प्रकार आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा,” असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे.

blank