28.3 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home विदर्भ भरधाव कार पुलावरून नहरात कोसळली; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

भरधाव कार पुलावरून नहरात कोसळली; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

0
4

गोंदिया -देवरी-आमगाव मार्गावरील हरदोली शेतशिवारात सोमवारी (दि. २७) पहाटे सुमारे १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. भरधाव कारचा ताबा सुटून ती पुलावरून थेट नहरात कोसळल्याने हा भीषण अपघात घडला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नागपूर येथून साखरीटोला येथे जात असताना कार क्र. एम एच ३५ ए जे ३७७७ या भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटून वाहन पुलावरील कठडा ओलांडत थेट नहरात कोसळले. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात सालेकसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला.या अपघातात लीलाबाई गौतम (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर विजय गौतम (वय ४८), सरिता गौतम (वय ४०, दोघेही रा. साखरीटोला) आणि यश लक्षणे (वय २५, रा. आमगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत जखमींना नहरातून बाहेर काढून प्राथमिक उपचार केले आणि त्यानंतर त्यांना आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून, काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मध्यरात्रीच्या प्रवासादरम्यान वाहन चालविताना पुरेशी विश्रांती घेणे आणि वेगावर नियंत्रण ठेवणे किती आवश्यक आहे, हे या दुर्घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सालेकसा पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत

blank