24.1 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home शैक्षणिक विद्यार्थिनी कु. गायत्री चौधरीला कुलगुरूंसोबत ध्वजारोहण करण्याचा मिळाला बहुमान

विद्यार्थिनी कु. गायत्री चौधरीला कुलगुरूंसोबत ध्वजारोहण करण्याचा मिळाला बहुमान

0
8

तिरोडा- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात तिरोडा येथील गुणवंत विद्यार्थिनी कु. गायत्री देवेंद्र चौधरी हिचा विशेष सन्मान करण्यात आला. एलएल.बी. परीक्षेत उल्लेखनीय शैक्षणिक गुणवत्ता संपादन करून मेरिटमध्ये स्थान मिळवल्याबद्दल तिला विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत राष्ट्रध्वज फडकाविण्याचा बहुमान मिळाला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने यंदाच्या स्वातंत्र्य दिनापासून एक अभिनव आणि प्रेरणादायी परंपरा सुरू केली आहे. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांमध्ये मेरिटमध्ये स्थान मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना कुलगुरूंसोबत ध्वजारोहण करण्याचा सन्मान देण्यात आला. या मानाच्या विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, नागपूर येथील एलएल.बी. विद्यार्थिनी कु. गायत्री देवेंद्र चौधरी हिचाही समावेश आहे.
कु. गायत्री हिने एलएल.बी. परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत मेरिटमध्ये स्थान प्राप्त केले. तिच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत विद्यापीठाने स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र प्रसंगी तिला मा. कुलगुरूंसोबत ध्वजारोहण करण्याचा बहुमान दिला. विधी शाखेतील विद्यार्थिनीला विद्यापीठाच्या सर्वोच्च शैक्षणिक नेतृत्वासोबत राष्ट्रध्वज फडकाविण्याची संधी मिळणे हा तिच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव मानला जात आहे.
या सोहळ्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर,प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे,कुलसचिव डॉ. विजय खंडाळ यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कु. गायत्रीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिरोडा परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या यशामुळे चौधरी कुटुंबीयांसह तिरोडा शहराच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कु. गायत्रीचे वडील देवेंद्र चौधरी हे तिरोडा येथील वकील असून नामांकित कवी व लेखक म्हणूनही त्यांची ओळख आहे. तसेच ते वकील संघ तिरोडाचे सचिव असून पोवार समाज संघटनेतही महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या सामाजिक व साहित्यिक कार्याची पार्श्वभूमी आणि कु. गायत्रीची शैक्षणिक मेहनत यामुळे चौधरी कुटुंबाचे हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे.
कु. गायत्रीच्या यशामागे तिची मेहनत, सातत्य, जिद्द आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची धडपड आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी तिला हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.