गोरेगाव : परशुराम विद्यालय मोहगांव बु. येथे ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, आनंदात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी. डब्ल्यू. कटरे यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. डिलेश्वरजी पटले यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास सर्व ग्रामस्थ, पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती व विविध शालेय समित्यांचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांच्या वतीने आकर्षक व मनमोहक म्युझिकल ड्रिल सादर करण्यात आली. या ड्रिलने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. तसेच विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तिपर व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाच्या प्रगतीमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व देशभक्तीची भावना दिसून आली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परशुराम विद्यालय मोहगांव बु. येथील मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.





