गोंदिया ( प्रतिनिधी):ग्रामपंचायतीचे सार्वजनिक प्रश्न आणि विविध स्थानिक विषयांवरून निर्माण झालेल्या वैमनस्यातून सरपंचांना मानसिक त्रास देणे, खोट्या तक्रारी दाखल करून दबाव निर्माण करणे आणि मारहाणीचा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप तालुक्यातील लोधीटोला येथे समोर आला आहे. या प्रकरणी सरपंचांच्या मुलीसह गावातील नागरीकांनी आज शहर पोलीस ठाण्याचे पो.निरीक्षक यांची भेट घेऊन निष्पक्ष चौकशीची मागणी करत निवेदन सादर केले आहे.
दिलेल्या निवेदनानुसार , त्यांचे वडील गावामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्यरत आहेत. गावातील विविध विकासकामे आणि सार्वजनिक प्रश्नांवरून काही स्थानिक व्यक्तींशी त्यांचे मतभेद झाले होते. या वैमनस्यातूनच त्यांच्या वडिलांविरुद्ध वारंवार खोट्या आणि वस्तुस्थितीविरुद्ध तक्रारी करून त्यांच्यावर मानसिक दबाव आणण्याचा व त्यांची सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
CCTV फुटेज आणि DVR तात्काळ जप्त करण्याची मागणी
अलिकडेच घडलेल्या एका मारहाणीच्या घटनेचा उल्लेख करत निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, या प्रकरणातील खरी वस्तुस्थिती निष्पक्ष तपासातूनच समोर येणे गरजेचे आहे. घटना नेमकी कशी घडली, वाद कुणी उकरून काढला आणि त्यावेळी कोण उपस्थित होते, याचा सत्य शोधणे आवश्यक आहे. या तपासात कुठलाही अडथळा येऊ नये किंवा पुरावे नष्ट केले जाऊ नयेत, यासाठी घटनास्थळ आणि परिसरातील CCTV, DVR व NVR फुटेज तात्काळ पोलिसांनी सुरक्षित ताब्यात घ्यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, पोलीस निरीक्षक शहर पोलीस कार्यालयात हे निवेदन सादर करताना लोधीटोला गावातील मोठ्या संख्येने महिला व पुरुष नागरिक उपस्थित होते. यावरून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येत असून, उपलब्ध वैद्यकीय अहवाल (Medical Reports), फोटो, व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून कायद्यानुसार योग्य ती निष्पक्ष कारवाई करण्यात यावी, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.





