बोपाबोडी येथे भेट देत कुटुंबीयांना दिला धीर; प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक मदतीचे आश्वासन
सडक अर्जुनी,दि.१८: देवरी तालुक्यातील ढासगड परिसरात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत तालुक्यातील बोपाबोडी येथील हेतराम गुलाब सयाम (२६) आणि कृष्णा लखन कापगते (२०) या दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार राजकुमार बडोलेनी बोपाबोडी येथे जाऊन दोन्ही मृत युवकांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्या दुःखात सहभागी होत कुटुंबीयांना धीर दिला.
स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मित्रांसोबत ढासगड परिसरात गेलेल्या या दोन तरुणांचा पाण्याच्या खोलीचा व प्रवाहाचा अंदाज न आल्याने दुर्दैवी अंत झाला. SDRF, पोलीस पथक तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रयत्नांनंतर दोन्ही युवकांचे मृतदेह शोधून काढले. या घटनेने बोपाबोडी परिसरावर शोककळा पसरली आहे.आमदार राजकुमार बडोले यांनी शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेऊन दुःखाच्या प्रसंगी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कुटुंबीयांना आवश्यक ती मदत व सहकार्य मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
यावेळी आमदार बडोले यांनी तरुण वयातील दोन मुलांचे असे अकाली निधन ही संपूर्ण परिसरासाठी अत्यंत दुःखद आणि कधीही न भरून निघणारी हानी आहे. या दुःखाच्या प्रसंगी दोन्ही कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. प्रशासनाच्या माध्यमातून कुटुंबीयांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी भावना व्यक्त केली.हेतराम सयाम आणि कृष्णा कापगते यांच्या निधनाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी भावना आमदार राजकुमार बडोलेनी व्यक्त केली.
यावेळी पंचायत समिती सभापती चेतन वळगाये, जिल्हा परिषद सदस्या निशा तोडासे, माजी जि.प. सदस्य रमेश चुऱ्हे, पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे, पंचायत समिती सदस्या वर्षा शहारे, सरपंच निखील मेश्राम, चरणदास शहारे, शुभम जनबंधू, कालिदास डोंगरवार, वैशाली रामटेके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.





