23.9 C
Gondiā
Wednesday, August 19, 2026
Home विदर्भ तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने १४ वर्षीय मुलीची सुटका

तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने १४ वर्षीय मुलीची सुटका

0
7
नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील पादचारी पुलाच्या सरकत्या जिन्याजवळ तिकीट तपासणी करताना मुख्य तिकीट निरीक्षक ममता राव यांना ही मुलगी संशयास्पद परिस्थितीत आढळली.
चौकशी केली असता मुलगी उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले. सुरुवातीला तिने आई-वडिलांचे निधन झाल्याचे सांगितले. मात्र, तिच्या परिस्थितीबाबत संशय आल्याने तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधून माहितीची पडताळणी केली. त्यावेळी तिचे आई-वडील जिवंत असल्याचे स्पष्ट झाले.
मुलगी अल्पवयीन असल्याने ममता राव यांनी तत्काळ चाइल्ड हेल्पलाइनशी संपर्क साधला. हेल्पलाइनच्या प्रतिनिधींच्या मदतीने मुलीला पुढील आवश्यक कार्यवाही आणि सुरक्षिततेसाठी शासकीय रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) ताब्यात देण्यात आले.
तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या वेळीच लक्षात आलेल्या या घटनेमुळे संभाव्य धोकादायक परिस्थिती टळली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलीला आवश्यक संरक्षण मिळाले असून, या घटनेतून रेल्वे स्थानकांवरील कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे.