सर्पदंश पीडित बालिकेच्या प्रकृतीची चौकशी
नागपूर, दि. २० -शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांची तसेच वैद्यकीय सुविधांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील सर्पदंश पीडित बालिकेच्या प्रकृतीचीही मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली.
नागपुरातील मेडिकल आणि मेयो या दोन मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना विविध विकास कामांसाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामांची प्रगती पाहण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी येथे भेट दिली. रुग्ण तसेच रुग्णांचे नातेवाईक यांच्याही दृष्टीने या दोन्ही रुग्णालयांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत तसेच अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची निर्मिती या ठिकाणी केली जात आहे. मेडिकलमध्ये एनआयसी, पीआयसीयू येथे भेट देऊन पीआयसीयूमधील व्हेंटिलेटर युनिटचे लोकार्पण यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे शस्त्रक्रियागृह, सर्जिकल आयसीयु येथेही मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना केल्या.
अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी सुरू असलेल्या कामांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आदिवासी आश्रम शाळेतील सर्पदंश घटनेतील एक होण्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेतील एक विद्यार्थिनी नागपूरला मेडिकलमध्ये दाखल आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज या विद्यार्थिनीची भेट घेऊन तिच्या आईशी संवाद साधला. त्याचप्रमाणे या बालिकेच्या प्रकृतीची योग्य काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी डॉक्टरांना दिल्या.उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, आ. मोहन मते, नगरसेवक रितेश गावंडे यावेळी उपस्थित होते.
मेयो येथे पाहणी
मेडिकलनंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेले. येथेही सध्या मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. या रुग्णालयात मेडिकल ब्लॉक, सर्जिकल ब्लॉक, शस्त्रक्रियागृह यांची पाहणी करून त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. झालेल्या कामांविषयी समाधान व्यक्त करतानाच कामाचा वेग वाढवा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.





