विशेष प्रतिनिधी | पुणे-पुण्यातील तरुण-तरुणींच्या आग्रहाखातर आणि ‘छात्रों की गूंज’ या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आज पुण्यात आगमन झाले. लोहगाव विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह, युवा कार्यकर्ते आणि हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विमानतळावरून बाहेर पडताच ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीने राहुल गांधींचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले.
पुण्यातील विविध संस्था आणि विद्यार्थी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाला तरुणांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सत्ताधारी पक्षाच्या आडमुठ्या आणि विरोधात्मक भूमिकेला न जुमानता पुण्यातील ‘जेन जी’ (Gen Z) युवा पिढी राहुल गांधींचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक दिसली.
कार्यक्रमाच्या ठिकाणाकडे जाणारे सर्व प्रमुख रस्ते दुतर्फा तरुणांच्या गर्दीने आणि वाहनांनी तुडुंब भरले होते. हातात फलक, पक्षाचे झेंडे आणि उत्साह घेऊन युवक-युवती घोषणा देत सभास्थळाकडे कूच करताना दिसल्या.विद्यार्थ्यांचे हक्क, रोजगार, शिक्षण आणि देशातील सद्यस्थिती या विषयांवर राहुल गांधी या कार्यक्रमातून तरुणांशी थेट संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमामुळे पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तसेच युवा वर्गात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.





