27.6 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home राजकीय समृद्धी महामार्ग ते थेट विमानसेवेपर्यंत प्रफुल्ल पटेलांनी मांडला विकासाचा ‘रोडमॅप’

समृद्धी महामार्ग ते थेट विमानसेवेपर्यंत प्रफुल्ल पटेलांनी मांडला विकासाचा ‘रोडमॅप’

0
101

गोंदिया:गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, हवाई आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीला गती देण्यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जात असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. रामनगर येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा सविस्तर ‘रोडमॅप’ मांडला.

समृद्धी महामार्गामुळे विकासाला चालना मुंबई-नागपूर-गोंदिया समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू असल्याचे सांगत खासदार पटेल म्हणाले की, “हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर केवळ गोंदियाच नव्हे, तर बालाघाट, आमगाव, देवरी आणि कोहमारा परिसरालाही मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांशी थेट आणि गतिमान कनेक्टिव्हिटी मिळेल. हा महामार्ग या भागाच्या व्यापार व आर्थिक प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल.

दिवाळीपर्यंत बिरसीतून विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न बिरसी विमानतळावरील बंद पडलेली विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गोंदिया-हैदराबाद मार्गावर अपेक्षित प्रवासी न मिळाल्याने ही सेवा प्रभावित झाली होती. आता दिवाळीपर्यंत गोंदिया ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू करण्यावर भर दिला जात असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.

मालधक्का हिरडामाली येथे हलवणार; उड्डाणपुलाला गती

  • रेल्वे समितीवर नियुक्ती: खासदार राजेंद्र जैन यांची संसदेच्या रेल्वे समितीवर निवड झाल्याने विदर्भ आणि विशेषतः गोंदियातील रेल्वे समस्या मार्गी लावणे सोपे होणार आहे.

  • वाहतूक कोंडीतून मुक्ती: शहरातील उत्तर भागातील वाहतूक कोंडी आणि शाळकरी मुलांची सुरक्षितता लक्षात घेता, सध्याचा रेल्वे मालधक्का हिरडामाली रेल्वे स्थानकाजवळ हलवण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे.

  • भीमनगर उड्डाणपूल: भीमनगर रेल्वे चौकी परिसरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी प्रस्तावित उड्डाणपुलाबाबत सकारात्मक पावले उचलली जात आहेत.

कर्जमाफी व बोनसवर लवकरच निर्णय शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना पटेल यांनी सांगितले की, २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि बोनसच्या मुद्द्यावर सरकार लवकरच ठोस भूमिका स्पष्ट करेल. यावर शासनस्तरावर सकारात्मक प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.