‘अर्जुनी मोरगाव विधानसभा कार्यक्षेत्राची एकात्मिक आरोग्यवर्धिनी’ समिती बैठक संपन्न
अर्जुनी मोरगाव,दि.२४ः- महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्राची एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची बैठक दि.21 ऑगस्ट रोजी अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमारजी बडोले यांचे अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली.
अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्रात जिल्ह्यातील सडक अर्जुनी,मोरगाव अर्जुनी व काही गोरेगाव तालुक्यातील गावे समाविष्ट असल्याने या बैठकीत तीनही तालुक्यातील गावातील कार्यक्षेत्रात आरोग्य सेवा अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव हा तालुका अतिदुर्गम व जंगलव्याप्त तालुका म्ह्णुन परिचीत आहे.तिच परिस्थिती सडक अर्जुनी व गोरेगावची आहे.तरी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे अधिक बळकट करून नागरिकांना दर्जेदार, सुलभ व वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.तसेच माता-बाल आरोग्य, नियमित लसीकरण, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
सडक अर्जुनी,मोरगाव अर्जुनी व गोरेगाव तालुक्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, यासाठी प्रशासनासोबत समन्वयाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा यावेळी निर्धार करण्यात आला.तसेच सभेप्रसंगी एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती गठीत करण्यात आली.सभेचे प्रस्ताविक सदस्य सचिव तालुका आरोग्य अधिकारी तालुका नियंत्रण पथक अर्जुनी मोरगाव डॉ.सुकन्या कांबळे यांनी केले त्यात त्यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यात दिली जात असलेली आरोग्य सेवेबाबतची माहीती समिती समोर सादर केली तसेच सडक अर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रणित पाटील व गोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी आपआपल्या तालुक्यामार्फत दिली जात असलेली आरोग्य सेवेबाबतची माहीती सादर केली.तर मोरगाव अर्जुनी तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालये,सात प्राथमिक आरोग्य केंद्रे,43 उपकेंद्रे,एक आपला दवाखाना व एक नागरी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र असे 54 आरोग्य संस्थामधुन लोकांना आरोग्य सेवा दिली जात आहे.तर सडक अर्जुनी तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालये,पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे,30 उपकेंद्रे व एक आपला दवाखाना असे 38 आरोग्य संस्थामधुन लोकांना आरोग्य सेवा दिली जात आहे.तसेच अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्रात गोरेगाव तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे लोकांना आरोग्य सेवा दिली जात आहे.
एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची सभेदरम्यान पंचायत समिती अर्जुनी मोरगाव सभापती आम्रपाली डोंगरवार,पंचायत समिती सडक अर्जुनी सभापती चेतन वळगाये,जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे,तहसीलदार अर्जुनी मोरगाव अनिरुद्ध कांबळे,तहसीलदार सडक अर्जुनी ईंद्रायणी गोमासे,गटविकास अधिकारी पंचायत समिती गोरेगाव सारीपुत्र घोटे,गट शिक्षणाधिकारी सडक अर्जुनी/अर्जुनी मोर सुभाषराम बागडे,उपअभीयंता महावितरण सडक अर्जुनी रविंद्र नरवाडे, उपअभीयंता बांधकाम विभाग आर.के.दरवडे,बालविकास प्रकल्प अधिकारी अर्जुनी मोर अनिलकुमार पटले,बालविकास प्रकल्प अधिकारी सडक अर्जुनी मनोहर तांडेकर,बालविकास प्रकल्प अधिकारी गोरेगाव चंद्रकला मेंढे,ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव वैद्यकीय अधिक्षक डॉ.नंदा गेडाम,ग्रामीण रुग्णालय नवेगाव बांध वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रविण ईरपाते,ग्रामीण रुग्णालय सौंदड वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिपक आगलावे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद चव्हाण,डॉ. प्रणित पाटील व डॉ.सुकन्या कांबळे,जिल्हा स्तरीय राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे यांचेसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती बैठक प्रसंगी अध्यक्ष आमदार राजकुमारजी बडोले यांनी माझं गाव-आरोग्य संपन्न गाव अभियान लोकसहभागातुन राबविण्यासोबत जनजागृतीची चळवळ उभारणे,आदिवासी तालुक्यात प्रारंभिक स्तरावरच कर्करोग,रक्तदाब,मधुमेह व सिकलसेल जनजागृती करुन तपासणी बाबत माहीती देवुन त्यासाठी लागणारे वैद्यकीय चमुचे नियोजन करण्यासाठी आरोग्य प्रशासनाला सहकार्य करण्याची हमी यावेळी दिली.तळागाळातील लोकांना आरोग्याच्या विविध योजना व कार्यक्रमांचा लाभ पोहचविण्यासाठी शासनाचे अधिकारी,कर्मचारी व सोबत पदाधिकारी यांनी समन्वय ठेवावा,तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी रिक्त पदे, अंगणवाडीतील बालकांची तपासणी,सँम व मँम बालके,पोषण पुनर्वसन केंद्रांतील भरती बालके उपचार,आरबीएस पथकामार्फत शाळा तपासणी,सिकलसेल तपासणी,पेट्रोकार्ड द्वारे रुग्णवाहिका ईंधन माहीती,आरोग्य संस्थेतील वीजबील भरणे बाबतची समस्या,परिचर कमतरता,सद्य स्थितीतील असांसर्गिक आजाराबाबत मधुमेह व रक्तदाब यांची 100 टक्के लोकांची तपासणी अशा विविध बाबीवर चर्चा करुन लोकांना गुणात्मक आरोग्य सेवा देण्याच्या विविध सुचना यावेळी दिल्या.
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्राची एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची सभा यशस्वी करण्यासाठी मोरगाव अर्जुनी व सडक अर्जुनी तालुका नियंत्रण पथकाचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.





