बाकटी येथे जनावरांच्या खाद्य बियाण्यांचे वाटप
अर्जुनी-मोर.-शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाची जोड देऊन शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून आपल्या कुटुंबाचे उत्पन्न वाढवावे. पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्यासाठी शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा पशुपालक शेतकरी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नवेगावबांध क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे यांनी केले.
तालुक्यातील पशुवैद्यकीय पशुचिकित्सालय, बाकटी येथे २१ ऑगस्ट रोजी पशु सुधार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना रचनाताई गहाणे बोलत होत्या. कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य पुष्पलताताई द्रुगकर, सरपंच सरिताताई राजगीरे, सरपंच सचिन डोंगरे, उपसरपंच काशिनाथ कापसे, गणेश बावणकर, लिलेश्वर खुणे, साईनाथ पाऊलझगडे, अरविंद शेंडे, गायत्री मेंढे, टोलीराम गहाणे यांच्यासह पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे डॉक्टर, कर्मचारी तसेच परिसरातील पशुपालक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांना जनावरांच्या खाद्यासाठी आवश्यक असलेल्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले. पशुधनाच्या योग्य संगोपनासाठी संतुलित आहार, नियमित पशुवैद्यकीय तपासणी, लसीकरण तसेच जनावरांच्या आरोग्याची वेळोवेळी काळजी घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
रचनाताई गहाणे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पशुपालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध पशुधन विकास योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित पशुवैद्यकीय दवाखाना व पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
शेती व्यवसायासोबत दुग्ध व्यवसाय, गोपालन व अन्य पशुपालन व्यवसायाला चालना मिळाल्यास ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना नियमित उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे पशुपालकांनी आधुनिक पद्धतींचा अवलंब करून पशुधनाची उत्पादकता वाढविण्यासोबतच शासनाच्या विविध योजनांचा योग्य प्रकारे लाभ घ्यावा, असे आवाहन रचनाताई गहाणे यांनी केले.
बैठकीदरम्यान उपस्थित पशुपालकांनी पशुधनाशी संबंधित विविध अडचणी व प्रश्न मांडले. संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याबाबत आवश्यक मार्गदर्शन केले. पशुपालकांच्या हितासाठी अशा उपक्रमांमधून शासकीय योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम अधिक प्रभावीपणे करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.




