अमरावती: येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्देवी घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. आग लागल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करीत इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. आगीवर लगेच नियंत्रण मिळवण्यात आले.या दुर्देवी घटनेत तीन बालकांचा मृत्यू झाला असून काही बालकांना पुढील उपचारासाठी जवळच असलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी)हलवण्यात आले आहे. त्यापैकी चार बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या बालकाच्या हाताला आणि पायाला भाजले असून अन्य तीन बालके किरकोळ भाजले आहेत. काही बालकांना डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातही दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी दिली.
सोमवारी पहाटेच्या सुमारास नवजात शिशू अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाला. त्यानंतर आग लागली. ती झपाट्याने पसरली. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या कक्षातील इतर बालकांना सुरक्षितपणे हलवण्यास सुरूवात केली. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली. या ठिकाणी एकूण तीन नवजात शिशू अतिदक्षता कक्ष आहे. या तीन कक्षांमध्ये एकूण प्रत्येकी १३ अशी मिळून ३९ नवजात बालकांवर उपचार करण्याची क्षमता आहे. त्यापैकी एका कक्षाला आग लागली. या कक्षात एकूण १२ बालके होती.
नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला आग लागल्याचे लक्षात येताच सेवेवर असलेल्या परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी धावपळ करून बाळांना बाहेर काढले, मात्र दुर्देवाने तीन बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. अवघ्या वर्षभरापुर्वी नवीन इमारतीत हा नवजात शिशू अतिदक्षत विभाग सुरू करण्यात आला होता. या ठिकाणी कमी दिवसांचे, कमी वजनाचे आणि गंभीर अवस्थेतील बालकांवर उपचार करण्यात येतात. मात्र, आग लागल्यानंतर रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा का कार्यान्वित झाली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील आपात्कालीन सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.





