अर्जुनी/मोरगाव,:शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय, अर्जुनी/मोरगाव येथील भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय अंतराळ दिन २०२६ ‘ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश्य विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन व भारताच्या अंतराळ क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञान, वैज्ञानिक संशोधन व नवोपक्रमाची आवड निर्माण करणे आणि जागतिक अंतराळ क्षेत्रात भारताची वाढती भूमिका अधोरेखित करणे हा होता. राष्ट्रीय अंतराळ दिन २०२६ ची संकल्पना “Towards Viksit Bharat – Innovating, Collaborating and Aspiring to Global Space Leadership” अशी होती.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ईश्वर मोहुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ भारत राठोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एस. आर. देशमुख उपस्थित होते. डॉ. लक्ष्मीकांत कापगते, आयक्यूएसी समन्वयक, गणित विभाग प्रमुख प्रा श्री. एम. डी. धुरटकर आणि मराठी विभाग प्रमुख डॉ. शरद मेश्राम , प्रा पंकज उके , प्रा अंकित नाकाडे , रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ नितीन विलायतकर , वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ लक्ष्मीकांत बोरकर , ग्रंथपाल प्रा अजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला
भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. एल. चौधरी यांनी प्रास्ताविकातून राष्ट्रीय अंतराळ दिनाचे महत्त्व स्पष्ट करून भारताच्या अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आढावा घेतला. भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान तसेच वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत व आत्मनिर्भर भारत घडविण्यात विद्यार्थ्यांची भूमिका अधोरेखित केली.डॉ. लक्ष्मीकांत कापगते यांनी अंतराळ विज्ञानातील अलीकडील घडामोडी, तांत्रिक नवोपक्रम आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमातील भविष्यातील संधी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक जिज्ञासा, सर्जनशीलता आणि संशोधनवृत्ती विकसित करण्याचे आवाहन केले.
प्रमुख पाहुणे डॉ. एस. आर. देशमुख विभाग प्रमुख सूक्ष्म जीवशास्त्र, शासकीय वैद्यकीय महावियालय, जगदलपुर, छत्तीसगड
यांनी भारतीय अंतराळ संशोधनाच्या यशस्वी वाटचालीवर माहितीपूर्ण व प्रेरणादायी व्याख्यान दिले. अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञानातील नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, नवोपक्रम आणि आंतरशाखीय अभ्यासाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले.
डॉ. भारत राठोड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून भौतिकशास्त्र विभागाच्या उपक्रमाचे कौतुक केले. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी वैज्ञानिक शिक्षण, नवोपक्रम आणि सहकार्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन ज्ञान व नवकल्पनांच्या माध्यमातून राष्ट्राच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अंतराळ विज्ञान, भारताच्या अंतराळ संशोधनातील प्रगती आणि नवोपक्रम यांसारख्या विषयांवर आकर्षक व माहितीपूर्ण पोस्टर्स सादर केले. पोस्टर स्पर्धेचे मूल्यांकन प्रा अंकित नाकाडे यांनी केले असून स्पर्धेत प्रथम क्रमांक शेजल वाळदे, द्वितीय क्रमांक स्नेहा दोहरे आणि तृतीय क्रमांक उन्नती गोलदार यांनी मिळविला. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले तसेच पोस्टर स्पर्धेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी मेश्रामने प्रभावीपणे केले व उन्नतीने आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना भारताच्या अंतराळ मोहिमांचे महत्त्व समजून घेण्याबरोबरच अंतराळ विज्ञान, भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्रांतील करिअर व संशोधनाच्या संधींबाबत मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि नवोपक्रमाची भावना वाढीस लागावी, या प्रेरणादायी संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ चौधरी, प्रा उके, भौतिक शास्त्र विभाग प्रयोगशाळा परिचर बादल लाडे, प्रा राऊत, सुहास राऊत इ. नी सहकार्य केले.





