अर्जुनी/मोरगाव : शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय, अर्जुनी/मोरगाव येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व IPR सेल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्थान (RGNIIPM), नागपूर यांच्या सहकार्याने ‘बौद्धिक संपदा हक्क, पेटंट व डिझाईन फायलिंगचा परिचय’ या विषयावर १८ ऑगस्ट २०२६ रोजी ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत भारताच्या विविध भागांतून ३३६ विद्यार्थी , शिक्षक व संशोधक सहभागी झाले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ईश्वर मोहुर्ले होते. IQAC समन्वयक डॉ. लक्ष्मीकांत कपगते यांची प्रमुख उपस्थिती होती. RGNIIPM, नागपूर येथील पेटंटचे सहाय्यक नियंत्रक श्री. कुमार राजू यांनी मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी बौद्धिक संपदा हक्कांची संकल्पना, पेटंटचे महत्त्व, आविष्कारांची पेटंट पात्रता तसेच पेटंट दाखल करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक आयोजन सचिव डॉ. डी. एल. चौधरी यांनी केले. त्यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना संशोधन, नाविन्यपूर्ण कल्पना आणि बौद्धिक संपदेचे संरक्षण यांचे महत्त्व अधोरेखित केले. विशेषतः संशोधक विद्यार्थी व उपस्थितांसाठी कार्यशाळेतील प्रात्यक्षिक स्वरूपाचे मार्गदर्शन उपयुक्त ठरले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रा. ईश्वर मोहुर्ले यांनी IQAC व RGNIIPM यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. बदलत्या शैक्षणिक वातावरणात संशोधन, नवोपक्रम आणि बौद्धिक संपदा हक्कांविषयी जागरूकता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षक, संशोधक व विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या बौद्धिक योगदानाचे पेटंट व इतर IPR माध्यमांतून संरक्षण करावे, असे आवाहन केले.
कार्यशाळेला शिक्षक, संशोधक विद्यार्थी तसेच पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध भागांतून सहभागी झालेल्या ३३६ विद्यार्थी , शिक्षक , संशोधकांमुळे कार्यशाळेला व्यापक प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचा समारोप प्रा. अंकित नाकाडे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी समिती समन्वयक डॉ चौधरी , प्रा नाकाडे , प्रा पंकज उके , डॉ लक्ष्मीकांत बोरकर , डॉ मनोज बांगडकर , डॉ आशिष कावळे यांचे सहकार्य लाभले .





