गोंदिया (प्रतिनिधी): नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे थकीत बिल (एरियस) काढून देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आणि ती स्वीकारणाऱ्या जिल्हा हिवताप कार्यालय, गोंदिया येथील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज, दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आली.
मारुती यादव दिपेवाड (वय ३९, आरोग्य सेवक, रा. हरफड, जि. नांदेड, ह.मु. गोंदिया) आणि नीरजकुमार नरेश अग्रवाल (वय ४०, वरिष्ठ लिपिक, रा. गोंदिया) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
घटनेची पार्श्वभूमी: तक्रारदाराचे वडील हे जिल्हा हिवताप विभागात आरोग्य सेवक म्हणून २०१६ मध्ये सेवानिवृत्त झाले होते व फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांचे निधन झाले. तक्रारदार मार्च २०२६ मध्ये त्यांच्या आईच्या कुटुंब निवृत्तीवेतनाबाबत माहिती घेण्यासाठी कार्यालयात गेले असता, वरिष्ठ लिपिक नीरजकुमार अग्रवाल यांनी तक्रारदाराच्या वडिलांचे नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढून देण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच मागितली होती.
त्यानंतर जून २०२६ मध्ये तक्रारदार पुन्हा गेले असता अग्रवाल यांनी त्यांना आरोग्य सेवक मारुती दिपेवाड यांना भेटण्यास सांगितले. दिपेवाड यांनी बिल मंजूर करण्यासाठी ७ हजार रुपयांची मागणी केली. २१ ऑगस्ट २०२६ रोजी पुन्हा विचारणा केली असता दिपेवाड यांनी ७ हजारांच्या लाचेचा पुनरुच्चार केला. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २४ ऑगस्ट २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार नोंदवली.
सापळा कारवाई व अटक: तक्रारीच्या अनुषंगाने २४ ऑगस्ट २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान आरोपी क्र. १ मारुती दिपेवाड यांनी ७ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली, तर आरोपी क्र. २ नीरजकुमार अग्रवाल यांनी त्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर रचलेल्या सापळ्यात दिपेवाड यांनी तक्रारदाराकडून ७ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच कार्यालयात हजर असलेल्या अग्रवाल यांनाही तात्काळ ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गुन्हा नोंदवताच त्यांना औपचारिक अटक करण्यात येईल.
कारवाई करणारे पथक: ही कारवाई ला.प्र.वि. नागपूरच्या पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी, पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, उमाकांत उगले, तसेच अंमलदार करपे, बोहरे, कहालकर, शेंडे, बोपचे, कापसे, काटकर, सोनवणे, बाटबर्वे, पटले व डांगे यांच्या पथकाने केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन: कोणत्याही लोकसेवकाने शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न न घाबरता एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा.





